नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक राहुल मधुकरराव सोनसळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या विकासासाठी आणि त्या ठिकाणी संशोधन केंद्र उभारण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे.
सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी पुतळा परिसराचा व्यापक विकास करणे आवश्यक आहे. तसेच या परिसरात संशोधन केंद्र स्थापन झाल्यास सामाजिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक अभ्यासाला चालना मिळेल.
याशिवाय, पुतळा परिसरातील अतिक्रमणे तात्काळ हटवून जागेचे सुशोभीकरण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. परिसरात हरित वातावरण निर्माण करून नागरिकांना स्वच्छ व प्रेरणादायी ठिकाण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे नांदेड शहराच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील, तसेच तरुण पिढीला डॉ. आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा मिळेल, असा विश्वास सोनसळे यांनी व्यक्त केला आहे.
