उच्च विद्याविभूषित सिद्धहस्त सर्जन डॉ.समीर कदम यांचे निधन

एमजीएम संस्थचे विश्‍वस्त,तथा हेल्थ सायन्सेसचे संचालक-अधिष्ठाता डॉ.सुधीरचंद्र कदम यांना पुत्रशोक
मुंबई  (प्रतिनिधी)-एमजीएम संस्थेचे विश्‍वस्त तथा एमजीएम हेल्थ सायन्सेस आणि एमजीएम हॉस्पिटल तसेच वैद्यकीय महाविद्यालय नवी -मुंबईचे संचालक अधिष्ठाता डॉ.सुधीरचंद्र नानासाहेब कदम यांचे सुविद्य पुत्र सिद्धहस्त शल्यविशारद डॉ.समीर सुधीरचंद्र कदम यांचे अल्पशा आजाराने आज रविवार दि.22 मार्च 2026 रोजी मुंबई येथे दुःखद निधन झाले आहे.ते 48 वर्षांचे होते.त्यांचे चुलते तथा एमजीएमचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री श्री.कमलकिशोर कदम यांनी डॉ.समीर कदम यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला असून,ते एक उच्च विद्याविभूषित,मितभाषी,सुस्वभावी,असे अधिव्याख्याता तसेच कुशल आणि निष्णात शल्यविशारद होते असे म्हटले आहे.डॉ.समीर यांचे जेष्ठ चुलते तथा एमजीएमचे सचिव आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलपती श्री.अंकुशराव कदम यांनी देखील या अनपेक्षित घटनेमुळे व्यक्तिशः मला,संबंध कदम परिवाराला,तसेच आमचे कनिष्ठ बंधू आणि डॉ.सुधीरचंद्र यांना मोठा धक्का बसला आहे.डॉ.समीर अत्यंत लाघवी स्वभावाचे,संवेदनशील मनाचे,आज्ञाधारक,समर्पणशील,सहकार्यप्रवण असे व्यक्तित्व होते असे म्हटले आहे.
डॉ.समीर कदम यांच्या निधनाने संपूर्ण एमजीएम परिवार तसेच कदम कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.दुःख व्यक्त करण्यास शब्द अपुरे आहेत.ज्याला अंगाखांद्यावर खेळवले,बोटास धरून चालवले,लहानाचा मोठा होताना पहिले,ज्याची शैक्षणिक झेप आणि प्रगती अनुभवली,ज्याच्या वैद्यकीय कौशल्याचा साक्षात्कार पहिला तो अचानक अर्ध्यावर जीवनप्रवास सोडून गेला.त्याच्या वेदना
शब्दापलीकडे आहेत.अशा भावना डॉ.समीर कदम यांचे काका तथा एमजीएमचे विश्‍वस्त डॉ.नितीन कदम,श्री.उज्ज्वल कदम आणि एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव यांनी व्यक्त केल्या आहेत.
डॉ.समीर कदम हे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय नवी मुंबई येथे सर्जरी विभागप्रमुख,आणि अधिव्याख्याता होते.त्यांनी एमजीएम मेडिकल कॉलेज नवी मुंबई येथून जनरल सर्जरी मध्ये एमएस,तसेच एमआरसीएस जनरल सर्जरी-यु.के.,एमएससी कँटरबरी युनिव्हर्सिटी न्यूझीलंड येथून पूर्ण केले होते.ते एमसीएच कार्डिओलॉजिस्ट,देखील होते.तसेच त्यांनी एमजीएम हेल्थ सायन्सेस मध्ये प्रवक्ता आणि व्हाईस चॅन्सलर म्हणूनही काम केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, आई-वडील, चुलते-चुलत्या, बंधू-भगिनी, वाहिनी असा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी मूळ गाव लिंबगाव,ता.जि.नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती कदम कुटूंबीयांकडून सांगण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!