नांदेड(प्रतिनिधी)- आज ईद-उल-फित्रची नमाज संपताच शहरातील ईदगाह मैदनापासून वाजेगावकडे जाणाऱ्या बंधाऱ्याच्या रस्त्यावर एक दुचाकीला आग लागली. त्यावरील स्वार 90 टक्के जळाला आहे. हा स्फोट ज्या ठिकाणी झाला. त्या ठिकाणापासून वाजेगावकडे जाणाऱ्या चढाच्या शेजारीच वाजेगावची ईदगाह मैदान आहे.
ईदगाह मैदानावरील ईदची सार्वजनिक नमाज संपल्यानंतर सकाळी 9.25 वाजता एक दुचाकी स्वार खुदबईनगर ते वाजेगावकडे जाणाऱ्या गोदावरी नदीवरील बंधारच्या रस्त्याने जात होता. त्याने बंधाऱ्याच्या रस्त्याने पुर्ण रस्ता पार केल्यानंतर तो वर जात असतांना त्याच्या दुचाकीमध्ये स्फोट झाला. तो खाली पडला, उठला तोपर्यंत त्या गाडीला आग लागली होती. युवकाच्या कपड्याला थोडीशी आग दिसत होती. तो पुन्हा जळालेल्या गाडीकडे जात होता. त्यामुळे त्याच्या शरिराला लागलेली आग जास्तच वाढत गेली. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी बरीच झाडे आहेत. त्या झाडांच्या फांद्यासुध्दा त्या आगीने जळाल्या. नमाजसाठी आलेल्या लोकांनी आपल्यासोबत आणलेल्या चटईने झाकून त्याची आग विझवली. त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त अगोदरच होता. त्वरीत प्रभावाने ऍम्बुलन्स बोलावण्यात आली आणि त्या जळालेल्या युवकाला शासकीय रुग्णालयात पाठविले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार तो युवक 90 टक्के जळाला आहे. त्याठिकाणी काही लोकांनी बनवलेल्या व्हिडीओमध्ये अनेक स्फोट होतांना दिसतात. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आम्हा प्राप्त झालेल्या जळालेल्या गाडीचा क्रमांक एम.एच.43 ए.ए.9252 आहे. आरटीओच्या ऍपवर या गाडी मालकाचे नाव शाम बाबाराव घाटगे असे आहे. पण याला प्रशासनिक स्तरावरून कोणीही दुजोरा दिलेला नाही. सध्या तरी जळालेल्या युवकाचे नाव माहित नाही. वाचकांनी आणि जनतेतील लोकांनी या संदर्भाने कोणत्याही अफवांवर विश्र्वास करू नये अशी नम्र विनंती आमची सुध्दा आहे. पोलीस या घटनांचा तपास करीत आहेत. यातील काय सत्यता आहे हे पोलीस शोधून काढतील आणि ते जनतेसाठी प्रसारीत पण करतील तेंव्हा कोणीतीही काही अफवा ऐकली तर पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून आपल्या समोर आलेली अफवा पोलीसांना सांगून त्याचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांनी केले आहे. वास्तव न्युज लाईव्हच्या वतीने सुध्दा अशी विनंती आम्ही वाचकांना करत आहोत.
संबंधीत व्हिडीओ….
वाजेगाव येथील गोदावरी नदीच्या बंधारा पुलावर दुचाकीचा स्फोट ; युवक 90 टक्के जळाला
