नांदेड- भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी, लोकशाही मार्गाने देशाचा विकास घडविण्यासाठी सुलभ व सर्वमान्य मतदान प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी आपल्या मताधिकाराचा योग्य वापर करावा, यासाठी जनजागृती अभियान म्हणून मंगल प्रसंगी मताधिकार बजावण्याची शपथ, घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील युवा मतदार, महिला मतदार, वंचित घटक तसेच सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल, बँक्वेट हॉल मालकांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान करण्याच्या या जनजागृती मोहिमेत सक्रीय सहभागासाठी आपल्या कार्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या लग्न कार्य, शुभ कार्यामध्ये व विविध प्रसंगामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी मतदान करण्याबाबतची शपथ घेण्यात यावी. तशी सूचना सर्व कार्यक्रमापूर्वी संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकांना द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
मतदारांसाठी प्रतिज्ञा याप्रमाणे आहे.
“आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.” ही शपथ घेताना नागरिकांचे सामुहिक छायाचित्र काढून दर 7 दिवसातून एकदा सर्व छायाचित्रे जिल्हास्तरीय स्वीप कक्षास सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.