· 9,10,11 मार्चला गुरुद्वारा मैदान, हिंगोली गेटवर दररोज सायंकाळी ६.३० वाजता सादरीकरण
नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्भुत जीवन चरित्राला प्रत्यक्ष डोळ्याने बघण्याची संधी 9 10 व 11 मार्च रोजी नांदेडकरांना आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासह या महा नाटकाला उपस्थित राहून नव्या पिढीला शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राला अनुभवण्याची संधी द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.
राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जात आहे. दि. 9,10,11 मार्च 2024 रोजी गुरुद्वारा मैदान हिंगोली गेट (सर्कस ग्राउंड, रेल्वे स्टेशन शेजारी )नांदेड येथे आबालवृद्धाना विनामूल्य महानाट्य पाहता येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
या संदर्भात वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या असून दररोज दहा हजार नागरिकांना बसण्याची सुसज्ज व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी आज दिले. शनिवार रविवार व सोमवार असे तीन दिवस हे प्रयोग होणार आहेत या प्रयोगाच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः अंगणवाडी सेविका, जिल्ह्यातील सर्व बचत गट सदस्य, आशा वर्कर व जिल्हा प्रशासनाच्या सेवेत असणाऱ्या आरोग्य यंत्रणा, विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, उद्योजक तसेच समाजातील सर्व घटकांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या आयोजन समितीला दिले आहेत. जिल्हाभरातील शाळांनी या संदर्भातील आपापले नियोजन करावे पाचवी इयत्ता वरील मुलांनी शाळेच्या शिक्षकांसोबत तर त्यापेक्षा लहान मुलांनी आपल्या कुटुंबासोबत शिवछत्रपतींचा इतिहास याची डोळा बघावा प्रत्येकाने आपल्या घरातील मुलाला या इतिहासाचे साक्षीदार व्हायची संधी द्यावी, असे आवाहन केले आहे.
शेकडो कलाकारांचा सहभाग आणि शिवचरित्रातील लक्षवेधी प्रसंगांची शृंखला, घोडे, उंट यांचा कल्पक वापर, तत्कालीन लोक कलेचे चित्तथरारक सादरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे हे महानाट्य प्रत्येक कुटुंबाने बघावे असे, आवाहनही करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित हे महानाट्य नांदेड जिल्ह्यामध्ये घेण्याबाबत राज्याचे ग्रामविकास पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सूचना केली आहे. यासाठी वाहनतळ, रस्ते मार्ग, आपत्ती व्यवस्थापन, बैठक सुविधा, जनजागृती आदि विषयांवर चर्चा व नियोजन करण्यात आले.
आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत 85 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही हे महानाट्य सादर झाले आहे. या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदिपक आतिषबाजीही असणार आहे, तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे.
12 व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. दररोज सायंकाळी साडेसहा वाजता प्रयोगाला सुरुवात होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या अविस्मरणीय क्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना छत्रपती शिवरायांवरील हे महानाट्य पहाता यावे यासाठी हदगाव, नरसी-नायगाव, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार, उमरी, भोकर या ठिकाणावरुन प्रेक्षकांना नांदेडला येण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासासाठी नांदेड बसस्थानकावरुनही जादा बसेसची सोय करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे असे एसटी महामंडळाच्या वतीने सांगितले आहे.