शासनाच्या सुविधांचा लाभ घेऊन ‘लोकल टू ग्लोबल’चा मार्ग स्वीकारण्याचे उद्योजकांना आवाहन नांदेड – नांदेड जिल्ह्यात उपलब्ध दळणवळणाच्या भक्कम पायाभूत सुविधा तसेच कृषीवर आधारित उत्पादन क्षमता पाहता निर्यातीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. उद्योजकांनी बाजारपेठेचे भान ठेवून भविष्यातील धोके ओळखावेत व केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून जिल्ह्यात निर्यातीस पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. निर्यात हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शासनाच्या विविध सुविधा व योजनांचा लाभ घेऊन नांदेड जिल्ह्याला ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज “महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” अंतर्गत आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, डाक विभागाचे अधिकारी अक्षय कुलकर्णी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे चांगदेव शेळके, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी पी. डी. मुळे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री. सोनकांबळे, ए.यू. स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापक अमरजितसिंघ, भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी सौरभ कुमार, नांदेड जिल्हा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष हर्षद शहा, आनंद बिडवई, निर्यातदार निलेश देशमुख तसेच निर्यातक्षम उद्योगांचे उद्योजक, नवउद्योजक व विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात जिल्हा निर्यात केंद्राची निर्मिती करणे व निर्यातीबाबत उद्योजकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी प्रास्ताविकात नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी केंद्र शासनाच्या डाक विभागामार्फत उपलब्ध असलेल्या डाक घर निर्यात केंद्र, डाक पोर्टल नोंदणी तसेच सुलभ व आधुनिक निर्यात प्रक्रियेबाबत अधिकारी अक्षय कुलकर्णी यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. उद्योग व व्यापार सुलभतेच्या दृष्टीने मैत्री कक्ष अंतर्गत उद्योगांच्या अडचणी एकाच छताखाली सोडविण्याची व्यवस्था असल्याचे अधिकारी धनश्री जाधव व मनोज डोमाणे यांनी ऑनलाईन मार्गदर्शनातून स्पष्ट केले. उद्योग सुरू करण्यासाठी कर्जविषयक अडचणी, शासकीय योजनांचा लाभ व उद्योजकांनी सकारात्मक मानसिकतेने पुढे येण्याची आवश्यकता बँक अधिकाऱ्यांनी अधोरेखित केली.केळी उत्पादन घटकाच्या संशोधन व निर्यात अनुभवाबाबत माहिती देताना निर्यातदार निलेश देशमुख यांनी निर्यातीतील अडचणी, त्यावरील उपाय तसेच ग्राहकांना गुणवत्तापूर्ण माल पुरविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यशाळेचे आभार प्रदर्शन व्यवस्थापक अनिल कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक सतीशकुमार चव्हाण, अरविंद भांडे, सोमेश आठवले, एमसीईडी संस्थेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यशाळेस सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटक, निर्यातदार, निर्यातक्षम व नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, शेतकरी सहकारी संस्था, प्रक्रिया उद्योग केंद्र, निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, संशोधक तसेच बँका व विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 635 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने महिलेची ६० हजारांच्या दागिन्यांची फसवणूक; आरोपी अटकेत चौथ्या जनहित राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. ललिता शिंदे/बोकारे यांची निवड