देगलूर (प्रतिनिधी)-मरखेल येथे रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे सराफा दुकानातील चोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावण्यात आला. या कारवाईत एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याच्याकडून सुमारे ७ लाख ४५ हजार ७९० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अन्य दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे.
दिनांक ३० जानेवारीच्या रात्रीपासून ३१ जानेवारीच्या पहाटेपर्यंत मरखेल हद्दीत गस्त घालणारे पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, पोलीस अंमलदार सैयद रफिक व यादव सोनकांबळे हे हाणेगाव येथे क्यूआर कोड स्कॅन करत असताना हणेगावच्या मुख्य बाजारातील आचरे ज्वेलर्स हे सराफा दुकान अर्धवट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकानासमोर एक व्यक्ती संशयास्पदरीत्या रेखी करत उभी असल्याचे दिसून आले.
मरखेल येथे चोरीचा प्रयत्न उधळताना ताब्यात घेतलेला आरोपी

परिस्थिती ओळखून पोलीस उपनिरीक्षक विलास पवार यांनी तातडीने आपले वाहन दुकानासमोर नेले. त्यावेळी रेखी करणाऱ्या आरोपीच्या इशाऱ्यावर दुकानातील अन्य दोन चोरटे सोन्या-चांदीचे दागिने एका पांढऱ्या पोत्यात भरून झाडीझुडुपा कडून पळून जात होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यातील एक आरोपी सेवकसिंग रघुसिंग तिलपत्ते (रा. उमरी) यास ताब्यात घेण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर व पोलीस अंमलदार नारायण यंगाळे घटनास्थळी दाखल झाले. चौकशीत पकडलेल्या आरोपीने चोरीचे संपूर्ण नियोजन तसेच त्याच्यासोबत असलेल्या दोन साथीदारांची नावे सांगितली. पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना करण्यात आली आहेत.
पकडण्यात आलेल्या आरोपीकडून २ किलो ६०० ग्रॅम चांदीचे दागिने (किंमत अंदाजे ७ लाख रुपये), ३० हजार ७९० रुपये रोख रक्कम, तसेच १ ग्रॅम वजनाचे १२ सोन्याचे मणी (किंमत अंदाजे १५ हजार रुपये) असा एकूण ७ लाख ४५ हजार ७९० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
या चोरीचा प्रयत्न अत्यंत जलद गतीने उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी या कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रत्येकी १० हजार रुपये, असे एकूण ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.या घटने बाबत अमित राजकुमार आचारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
७.४५ लाखांच्या ऐवज

