मुदखेड (प्रतिनिधी)- तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने पोलीस विभागाच्या मदतीने मोठी कारवाई केली. आज 31 जानेवारी रोजी सकाळी सुमारे दहा वाजता मुदखेड जवळील वासरी शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा टाकून तब्बल 75 लाख 30 हजार रुपयांचे साहित्य जप्त करून तेथेच ब्लास्ट करण्यात आले.
मुदखेडचे नायब तहसीलदार मारोतराव साहेबराव जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महसूल व पोलीस पथकाने संयुक्त कारवाई करत नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच छापा टाकला. या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन लहान बोटी, पंधरा लाख रुपये किमतीचे तीन हॉपर, वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे 60 लाख रुपयांचे दोन थर्माकोलचे तराफे तसेच 30 हजार रुपयांचे अन्य साहित्य असा एकूण 75 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
महसूल विभागाला असलेल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करून सदर सर्व साहित्य जिलेटीनच्या साह्याने ब्लास्ट करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. कारवाईदरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेले संशयित व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाले.
ही संपूर्ण कारवाई नायब तहसीलदार मारोतराव जगताप, मुदखेडचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, तहसीलदार आनंद देऊळगावकर, सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, तसेच महसूल कर्मचारी आणि पोलीस अंमलदार कवठेकर, कदम, साखरे, देशमुख यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली.अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून पुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
