मला माझ्या गुरुवर गर्व आहे. आणि मला त्यांच्याकडून कायम भिक्खू होण्याची प्रेरणा मिळाली. कायमस्वरुपी आजीवन भिक्खुची दीक्षा मिळाली. त्यामुळे मी अजीवनर त्यांच्याप्रती कृतज्ञ असून कायम ऋणी आहे. माझ्यासारख्या अनेक तरुण भिक्खुंना त्यांनी घडवले आहे.
धम्माच्या प्रती त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. आळसाला त्यांच्या शरीरामध्ये कवडीचीही जागा नाही. रात्रंदिवस धम्माचे काम करण्यासाठीच जणू काही त्यांचा जन्म झाला असे दिसून येते. सारख्या सारख्या धम्म परिषदा आणि मधून सतत धम्मदेशना सतत रात्रंदिवस प्रवास तरी सुद्धा त्यांचा थकलेला चेहरा कधीच दिसत नाही. चेहर्यावरती धम्माचे तेज आणि कमालीचा आत्मविश्वास दिसतो. भंतेजींनी एखाद्या विषयाला हात घातला आणि त्यांना अपयश आले असे कधी झाले असेल असे मला वाटत नाही. धम्माचे एवढे बल त्यांना मिळाले आहे की, ते जिथे पाय ठेवतील तिथे धम्माचे महान काम होत आहे, उभे राहिले आहे. हजारो लाखो लोक त्यांच्या धम्म प्रचार- प्रसाराने धम्मवान बनले आहेत.
धम्मकार्यासाठी जमिनी घेणारा, जमीनी दान देणारा, बुद्धविहाराची निर्मिती करणारा, आर्थिक दान देणारा, बुद्ध विहाराची निर्मिती करणारा, आर्थिक दान देणारा, शिल पालन करणारा, धम्म श्रवण करणारा, बुद्धविहारात जाणारा, मोठा उपासक- उपासिकांचा वर्ग आदरणीय गुरु डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो यांच्यामुळे महाराष्ट्र आणि देशात निर्माण झाला आहे.
स्वच्छतेची अतिशय मनापासून आवड मग ती विहार किंवा विहाराच्या परिसराची असो किंवा स्वतःच्या शरीराबाबत असो अथवा अंगावरील चिवराबाबत असो. टापटीप राहीणे हा आदर्श भंतेजींकडून घेण्यासारखा आहे. भिक्खू संघ संघटीत कसा राहील यासाठी भंतेजींचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. समाजाचे संघटन सुद्धा भंतेजींच्या माध्यमातून अनेकवेळा बघायला मिळते. एक कुशल संघटक म्हणूनही त्यांच्याकडे बघितल्या जाते.
लोकांच्या अडीअडचणीत, सुख- दुःखात धावून जाणे त्यांना सहकार्य करणे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हा त्यांचा पिंडच आहे. अनेक नवतरुण भिक्खूंना त्यांनी धम्म परिषदांच्या माध्यमातून बोलके केले आहे. त्यांना प्रवचन देण्यासाठी धम्ममंच निर्माण करुन दिला. आम्हा शिष्यांना त्यांनी घडवलेच. आमचे ते गुरु आहेतच यात शंका नाही. परंतु अनेक नवतरुण भंतेजींचे शिष्य नसतानाही त्यांनी भंतेजींकडून दीक्षा घेतलेली नसतानाही ते भंतेजींना गुरुचा दर्जा देतात. भंतेजींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. भंतेजींच्या कार्याला तोड नाही. त्यांच्यातील सद्गुणांची अनेक तरुण भंतेजी आदरणीय गुरु भदन्त उपगुप्त महाथेरो यांची त्यांच्या पाठीमागेही प्रशंसा करतात. हे ऐकताना आम्हालाही मनःस्वी आनंद होतो. भंतेजींपेक्षा जेष्ठ असलेले भिक्खूही भंतेजींचा गौरव करत असतात. भंतेजींचे नाव फार दूर- दूर पसरले आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक अशा काही राज्यात भंतेजींचे कार्य आहे. महाराष्ट्राच्या लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) व नांदेड अशा अनेक जिल्ह्यात माझ्यासारखे अनेक शिष्य धम्माचे कार्य करतात. एकापेक्षा एक भंतेजींनी आपल्या शिष्यांची फळी निर्माण केली आहे. ते भंतेजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अविरतपणे धम्म कार्य करत आहेत. दक्षिण कोरीया सारख्या देशात भंतेजींचे शिष्य आहेत.
अनेक ठिकाणी जमीनी विकत घेतल्या तिथे मोठमोठ्या धम्म परिषदा भरत आहेत. त्या माध्यमातून एक आदर्श सुसंस्कारीत पिढी घडत आहेत. असा काही काळ बघायला मिळतो. काही माणसे एकमेकांना नमस्कार, जयभीम सुद्धा घालत नाहीत. एकमेकांना पाहून तोंड वाकडी करतात. भंतेजींच्या चरणावरती डोकं इथल्या सर्वसामान्यांपासून ते आमदार, खासदार, मंत्री सुद्धा टेकवून त्यांचा आशीर्वाद घेतात. याचे कारण त्यांच्या मनात कोणाविषयीही द्वेष नाही, सर्वांप्रती मंगलमैत्री आहे. माणूस एखाद्या विशिष्ट जातीत जन्माला आला म्हणून मोठा होत नसतो तर तो त्यांच्या कर्माने मोठा होत असतो, या गोष्टीवर भंतेजींचा ठाम विश्वास आहे.
आदरणीय गुरु डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो यांना शिक्षणाची मनापासून आवड आहे. बुद्धविहारात त्यांनी त्यांचे गुरु भदन्त उपाली थेरो यांच्या नावे सुंदर ग्रंथालयाची निर्मिती केली. अनेक विद्यार्थी तिथे अभ्यास करुन वेगळ्या पदावर रुजू झाले आहेत. भंतेजी स्वतः पाली अॅण्ड बुद्धीजम् विषयात पीएच.डी. आहेत. म्हणून त्यांच्या नावापुढे सन्मानपूर्वक डॉक्टर लागले आहे. मध्यंतरी त्यांना आजारपणाचाही सामना करावा लागला. पाठीला आलेल्या गाठीचे ऑपरेशनही करावे लागले. त्यांना त्यामधून थकवा जाणवत होता. श्वाच्छोश्वास घेण्यासाठी त्रास होत होता. डॉक्टरांनी भंतेजींना आराम आवश्यक आहे असे सांगितले असतानाही भंतेजी लातूरच्या धम्म परिषदेसाठी निघाले होते. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जालन्याजवळ परत भंतेजींची प्रकृती बिघडली आणि त्यांना 24 डिसेंबर 2025 ला जालन्यातच अॅडमिट व्हावे लागले. दिल्लीवरुन पुज्य भदन्त करुणानंद महाथेरो अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक भंतेजींच्या विनंतीवरुन दि. 25 डिसेंबर 2025 रोजी होणार्या धम्म परिषदेसाठी आले होते. परंतु भंतेजींना केवळ प्रकृती ठिक नसल्यामुळे येता आले नाही. परंतु शेवटपर्यंत येण्याचा त्यांनी प्रयत्न केला. माझे फोनवर बोलणे होत होते. धम्माप्रती अस्सिम श्रद्धा बाळगणारे आदरणीय गुरु डॉ. उपगुप्त महाथेरोंप्रती विनम्र प्रणाम !
– भदन्त पंय्याबोधी थेरो
मो.नं. 8308887988
