काल सकाळी एका खाजगी विमानाचा अपघात झाला, अशी अफवा पसरल्यानंतर त्यावर विविध चर्चा सुरू झाल्या. अशा घटनांनंतर हवाई सुरक्षेचा मुद्दा, चौकशीची प्रक्रिया आणि त्यासंबंधी वेगवेगळे तर्क मांडले जाणे स्वाभाविक असते. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही घटना निव्वळ अपघात असल्याचे सांगत त्यावर राजकारण करू नये, असे मत व्यक्त केले. मात्र अशा गंभीर घटनांवर चर्चा होणे अपरिहार्य आहे आणि त्या चर्चांमधूनच अनेक महत्त्वाचे प्रश्न समोर येतात.
ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या विमानाचे उत्पादन संबंधित कंपनीने सन 2012 मध्ये बंद केले होते. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्याचे सुटे भाग उपलब्ध होते. विमान उत्पादन बंद करताना संबंधित कंपनी खरेदीदारांना आवश्यक सुटे भाग उपलब्ध करून देण्याबाबत पूर्वसूचना देते. हे विमान एका खाजगी कंपनीचे असून अशा प्रकारची विमाने प्रामुख्याने कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती किंवा मंत्रीवर्गीय वापरतात. या विमानाची मालकी अजित पवार यांच्याकडे होती की ते भाड्याने घेतले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विमानाच्या तांत्रिक बाबींचा विचार करता, ते विमान रडारच्या कक्षेत बारामतीपर्यंत येऊन पुन्हा परतल्याचे दिसून येते. ते का परतले, याबाबत विविध तर्क मांडले जात आहेत. काहींच्या मते दृश्यता कमी असल्यामुळे विमान परतले. मात्र विमानाने उड्डाण करतानाच हवामानाची माहिती घेतली गेली असणार, त्यामुळे या कारणावर कितपत विश्वास ठेवायचा, हा प्रश्न उपस्थित होतो.
विमानातील शेवटचे शब्द पायलट शांभवी यांचे असल्याचे सांगितले जाते. त्यांनी “ओ शीट” असे शब्द दोन वेळा उच्चारल्याचे नोंदवले गेले आहे. यावरून अचानक आणि नियंत्रणाबाहेर गेलेली परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इतर तपशील पुढील तपासातून समोर येतील.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी एका वक्तव्यात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांसोबतच सत्ता चालवत असल्याचे सांगितले होते. तसेच, भारतीय जनता पक्षाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या संचिका असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. सध्याच्या महाराष्ट्रातील सत्तास्थितीत त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. एक बहुआयामी नेतृत्व, खेळकर वृत्ती आणि दणकट प्रशासक अशी त्यांची ओळख होती.
या पार्श्वभूमीवर भूतकाळातील काही विमान अपघातांची आठवण होते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी, माजी मंत्री माधवराव सिंधिया, माजी मंत्री राजेश पायलट, भारताचे माजी लष्करप्रमुख बिपिन रावत, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी,सुरक्षा प्रमुख बिपीन रावत तसेच अहमदाबाद येथील विमान दुर्घटना. या घटनांच्या चौकशांचे निष्कर्ष आजही संपूर्णपणे जनतेसमोर आलेले नाहीत.

अलीकडील एका विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह सुमारे 270 जणांचा मृत्यू झाला होता. या संदर्भात भारताच्या हवाई मंत्रालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. ब्लॅक बॉक्समधून काही महत्त्वाची माहिती समोर येईल, अशी अपेक्षा आहे. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे. मात्र ही चौकशी कोणाच्या नियंत्रणाखाली होईल, तिच्यावर देखरेख कोण ठेवेल आणि ती कितपत पारदर्शक असेल, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
काही प्रत्यक्षदर्शींनी विमान हवेत असतानाच काहीतरी अघटित घडणार असल्याची भावना झाल्याचे सांगितले आहे. काही सेकंदांतच विमान खाली येऊन शेतात कोसळले आणि स्फोट झाला. या विमानाचे पायलट कपूर यांना सुमारे 15,000 तासांचा, तर सहायक पायलट पाठक यांना सुमारे 1,500 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. त्यामुळे मानवी चुकांची शक्यता तुलनेने कमी मानली जाते.
तांत्रिक तज्ज्ञांच्या मते, या विमानात दोन इंजिने होती. एक इंजिन निकामी झाले तरी दुसरे कार्यरत राहते. मात्र या प्रकरणात दोन्ही इंजिने एकाच वेळी निकामी झाली का, याचा शोध घेणे आवश्यक आहे. काही अनुभवी पायलटांच्या मते, धावपट्टी स्पष्ट न दिसल्यामुळे पहिल्यांदा विमान पुन्हा वर नेण्यात आले आणि दुसऱ्या प्रयत्नात काही तांत्रिक अडचणी आल्याने अपघात झाला असावा.
संबंधित कंपनीची जगभरात केवळ 200 विमाने असून भारतात हा दुसरा अपघात असल्याचे सांगितले जाते. हे विमान दोन तासांसाठी भाड्याने घेतल्यास सुमारे आठ ते दहा लाख रुपये खर्च येतो. संबंधित कंपनीकडे अशी सात विमाने असून त्यापैकी एकाचा अपघात झाला आहे. डीजीसीएने या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे सांगितले जात असून दोन-चार दिवसांत प्राथमिक अहवाल येण्याची शक्यता आहे.
एकूणच ही घटना केवळ “दुर्दैवी” या शब्दात मावणारी नाही. अशा गंभीर दुर्घटनांची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

