नियम एकीकडे, वास्तव दुसरीकडे! पोलीस निरीक्षक बदलीचा अनोखा प्रवास – ऑर्डर पास, प्रक्रिया मिसिंग! पोलीस प्रशासनात नेमकं काय बिनसलं?
परभणी (प्रतिनिधी)- अनेक कारणांनी ‘नामवंत’ ठरलेले परभणीचे पोलीस निरीक्षक अशोक ययातीराव घोरबांड अखेर प्रजासत्ताक दिनी परभणी जिल्ह्यातून कार्यमुक्त झाले कागदोपत्री! परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी त्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव (जि. लातूर) येथे पाठवण्याचे आदेश पारित केले. आदेश दिनांक 26 जानेवारी 2026. दिवस राष्ट्रीय सण. सुट्टीचा दिवस तरीही आदेश निघाला. प्रशासनाच्या तत्परतेला सलाम!
मात्र खरी गंमत पुढेच आहे. आज दिनांक 28 जानेवारी उजाडूनही, पोलीस नियंत्रण कक्षातून मिळणारे मी बदलीवर जात आहे असे आवश्यक पत्र घेण्याची तसदी संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेलीच नाही. नोंद नाही, पत्र नाही पण आदेश मात्र आहे! हा नवा प्रशासकीय प्रयोग नेमका कशाचा? या संदर्भात वास्तव न्यूज लाईव्ह ने शनिवार, 24 जानेवारी रोजीच बातमी प्रसिद्ध केली होती. म्हणतात ना बातमी छापली की यंत्रणा हलते. यावेळीही तसेच झाले, असे म्हणायला हरकत नाही.
नांदेडसह अनेक जिल्ह्यांत आपली कारकीर्द गाजवणारे पोलीस निरीक्षक घोरबांड डिसेंबर महिन्यात परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत असताना सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आले. या प्रकरणात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात त्यांचे निलंबन जाहीर केले होते. निलंबनाच्या तीन महिन्यांनंतर त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, छत्रपती संभाजीनगर येथे अर्ज दाखल केला. निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि सेवेत पुन्हा हजर करून घ्या असे आदेश आले. पण इथेही वळण आहे. खरी बदली तर 2024 मध्येच झालेली होती! तरीही ते परभणी जिल्ह्यात हजर झाले. पहिल्याच दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयात रील तयार करून ती सोशल मीडियावर टाकली आणि पुन्हा कार्यरत झाले. प्रशासनापेक्षा सोशल मीडिया अधिक प्रभावी असल्याचा हा नवा पुरावा!
26 जानेवारी रोजी, पोलीस अधीक्षक कार्यालय, परभणी यांनी आदेश क्रमांक जाक्र/पव्य/5/कार्यमुक्त -2026/3467139 नुसार, पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांच्या 2024 च्या बदल्यांचा संदर्भ देत त्यांना बाभळगाव, लातूर येथे कार्यमुक्त केले. पण नियम सांगतात बदली झालेल्या अधिकाऱ्याने नियंत्रण कक्षात नोंद करावी, पत्र घ्यावे आणि नवीन ठिकाणी रवाना व्हावे. येथे मात्र नोंद नाही, पत्र नाही, आणि तरीही कार्यमुक्ती आहे.पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या बदलीचे आदेश आजच पोलीस नियंत्रण कक्ष येथे प्राप्त झाले आहेत. पण वृत्त लिही पर्यन्त तरी नियंत्रण कक्षांतून बदलीवर सुटल्याचे पत्र मात्र घेण्यात आले नव्हते.
मग प्रश्न साधा आहे—
हा अधिकारी परभणीत आहे की लातूरमध्ये?
सेवेत आहे की कार्यमुक्त?
आणि हा सगळा प्रकार नियमांनुसार आहे की “नव्या परंपरेनुसार”?
एक मात्र नक्की..
हा प्रकार नवा आहे… आणि तो कधी सुरू झाला, हे शोधण्याची जबाबदारी आता प्रशासनावरच आहे!
संबंधित बातमी ..
पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड प्रकरण : बदली आदेश, गैरहजेरी व चौकशी प्रक्रियेवर कायदेशीर प्रश्न
