प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात केंद्र सरकारने पुन्हा एकदा आपली लोकशाहीची उंची दाखवली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे दोघांनाही थेट तिसऱ्या रांगेत बसवून तुमची जागा ओळखा असा सूचक इशारा देण्यात आला. लोकशाहीचा सन्मान एवढाच उरला आहे, हे पाहून खुर्च्यांनाही लाज वाटली असेल!
हा प्रकार मोठा होईल, याची जाणीव होताच संध्याकाळच्या राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’ कार्यक्रमात खऱ्या घटनेला खोट्या कथेत रंगवण्याचा प्रयत्न सुरू झाला हेच तर भाजपचे प्रचार-तंत्र आहे, नाही का? आणि या कथानकात स्वतःचे हास्य करून घेण्याचे काम आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी मनापासून केले. त्यांचा दावा असा की ॲट होम कार्यक्रमात युरोपियन युनियनच्या अध्यक्षांसोबत जेवणासाठी दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण होते, उत्तर-पूर्वेची ओळख म्हणून दिलेला पारंपरिक पंचा त्यांनी परिधान केला नाही, म्हणून त्यांना उत्तर-पूर्वेत मतदान मागण्याचा अधिकार नाही! वाह रे तर्कशास्त्र! उद्या कोणी टोपी घातली नाही, तर डोकं वापरण्याचाही अधिकार काढून घ्याल का?


पण हा दावा खोटा होता आणि त्या खोट्यावरच भाजपचा प्रचार तंत्र राबवला गेला. प्रत्यक्षात केंद्र सरकारचेच तीन मंत्री राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन आणि शेखावत यांनी तो पंचा ना परिधान केला, ना हातात धरला. हे कुणालाच दिसले नाही? की दिसूनही अंधत्व आलं? मग आरोपी राहुल गांधीच का? राहुल गांधींनाच आरोपी ठरवण्यात नेमका फायदा काय? उत्तर सोपं आहे आसाम निवडणुका जवळ आल्या आहेत. उत्तर-पूर्वेचा वारसा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. राहुल गांधींनी पंचा घातला असता तर गोदी मीडियाने आरडाओरडा केला असता मोदींनी राहुलला आपल्या रंगात रंगवलं! आणि घातला नाही म्हणून राहुल गांधींना उत्तर-पूर्वेची किंमत नाही!
म्हणजे दोन्ही बाजूंनी कटच फक्त स्क्रिप्ट बदलायची!
खरं तर उत्तर-पूर्व अडीच वर्षांपासून जळत असताना भाजपचा एकही बडा नेता तिकडे फिरकला नव्हता. तेव्हा राहुल गांधी मात्र वाघासारखे तिथे गेले, रडणाऱ्या महिलांना धीर दिला. पण हे दृश्य गोदी मीडियाच्या कॅमेऱ्यांना कधीच दिसत नाही. आज मात्र पंचा घातला नाही यावर अख्खं स्टुडिओ पेटलं! वस्तुस्थिती अशी की राहुल गांधींनी पंचा सुरुवातीला परिधान केला, नंतर तो हातात घेतला आणि कार्यक्रमभर तो त्यांच्या हातात दिसतच राहिला. म्हणजे सन्मान केला की नाही? आणि केंद्राचे मंत्री? ना अंगावर, ना हातात. मग अपमान कोणी केला, उत्तर-पूर्वेचा अवमान कोणी केला हे जनतेला कळत नाही का?

यापेक्षाही पुढचा प्रसंग अधिक बोलका आहे. जेवणानंतर मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या खुर्चीकडे गेले, नमस्कार केला. त्यांच्या मागे राहुल गांधी उभे होते,त्यांनीही नमस्कार केला. समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेले. राष्ट्रपती उभ्या राहिल्या नाहीत ठीक आहे. पण पंतप्रधानांनी युरोपियन युनियनच्या अध्यक्षांसमोर दोन्ही विरोधी पक्षनेत्यांची ओळखही करून दिली नाही! खरं तर विरोधी पक्षनेते हे कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात. शॅडो कॅबिनेट ही काही अफवा नाही हे सत्य आहे. संपूर्ण जग ज्यांना ओळखतं त्या राहुल गांधींची ओळख करून देण्याचीही सौजन्य नाही? युरोपियन युनियनच्या अध्यक्षांच्या मनात यामुळे काय प्रतिमा गेली असेल हे वेगळं लिहायची गरज आहे का? आणि या सगळ्याच्या मुळाशी कारण काय? राहुल गांधींनी आधीच सांगितलं होतं हेमंत विश्व शर्मा काही दिवसांत जेलमध्ये जाणार आहेत, कारण भ्रष्टाचाराचे डोंगर त्यांनी उभारले आहेत. काँग्रेसमध्ये असताना भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मग भाजपमध्ये उडी, आणि आज काँग्रेसवर प्रवचन!

हे काही नवीन नाही. जनता सगळं पाहते आहे.
फक्त परिणाम कधी होईल, हेच एक कोडं आहे
आणि त्याचं उत्तर, नेहमीप्रमाणे, देवालाच ठाऊक! 
