नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या १५० दिवसीय गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या मूल्यांकनात नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस परिक्षेत्रांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यापूर्वीही मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या १०० दिवसीय कृती आराखड्यात नांदेड पोलीस परिक्षेत्राने राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता.
दिनांक ७ मे २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्रशासकीय सुधारणा घडवून आणण्यासाठी १५० दिवसीय गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या कार्यक्रमास १ ऑक्टोबर २०२५ रोजी मुदतवाढ देण्यात येऊन १० जानेवारी २०२६ पर्यंत अंमलबजावणी करण्यात आली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक व तंत्रज्ञानाधिष्ठित बनविणे हा होता.
या अनुषंगाने संकेतस्थळ सुधारणा, आपले सरकार ई-पोर्टल, ई-ऑफिस प्रणाली, डेटा डॅशबोर्ड, सोशल मीडिया एकत्रीकरण, व्हॉट्सॲपद्वारे सेवा वितरण तसेच दामिनी पूर्ण अॅप्लिकेशन यांसारख्या बाबींवर विशेष भर देण्यात आला. नांदेड पोलीस परिक्षेत्राने आपले संकेतस्थळ नव्याने विकसित करून ते अधिक सुरक्षित व नागरिकाभिमुख बनविले असून त्यावर विविध शासकीय योजना व सेवांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
आपले सरकार पोर्टलअंतर्गत प्राप्त तक्रारींचे वेळेत निवारण, ई-ऑफिस प्रणालीद्वारे कागदविरहित व जलद फाईल निकाली काढण्याची प्रक्रिया, तसेच इंटरॲक्टिव्ह डेटा डॅशबोर्डद्वारे अचूक व अद्ययावत माहिती सादर केल्यामुळे प्रशासकीय निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी झाली आहे. सेवा वितरणासाठी व्हॉट्सॲपचा प्रभावी वापर करून अंतर्गत समन्वय अधिक बळकट करण्यात आला आहे.
यासोबतच परिक्षेत्रातील अर्ज व चौकशी कामासाठी ‘संवेदना’ ही AI आधारित संघटनात्मक कार्यप्रणाली विकसित करण्यात आली असून तिचा प्रभावी वापर सुरू आहे. या प्रणालीद्वारे अर्ज व चौकशी पूर्ण झाल्यानंतर तक्रारदारांना त्यांच्या तक्रारीवर अभिप्राय नोंदविण्यासाठी फीडबॅकची सुविधा देण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयात स्वतंत्र Facebook सेल देखील सुरू करण्यात आला आहे.
गुन्ह्यांच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी Eagle Eye : Crime investigation monitoring सुरू करण्यात आली असून, परिक्षेत्रातील गैरप्रकार व अवैध बाबींच्या निर्मूलनासाठी ‘खबर’ हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर हेल्पलाईनचा क्रमांक ९१५०१००१०० असा असून, यामुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातील अवैध बाबींबाबत माहिती देणे सुलभ झाले आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाने केलेल्या या सर्व कामकाजाची भारतीय गुणवत्ता परिषद (Quality council of india) यांनी दखल घेतली. १५० दिवसीय कार्यक्रमाची मुदत १० जानेवारी २०२६ रोजी पूर्ण झाल्यानंतर, परिक्षेत्रीय कार्यालयांच्या कामगिरीचे प्रथम मूल्यांकन पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आले. त्यामधून चार परिक्षेत्रीय पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयांची निवड झाली, ज्यामध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाचा समावेश होता.
त्यानंतर भारतीय गुणवत्ता परिषदेकडून अंतिम मूल्यांकन करण्यात आले. २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र शासनाने निकाल जाहीर केला, ज्यामध्ये राज्यातील सर्व पोलीस परिक्षेत्रांमधून नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयास प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
हे यश परिक्षेत्र कार्यालयातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसह Rythmbytes कंपनीचे सॉफ्टवेअर इंजिनिअर हर्षानंद शर्मा, SETTribe कंपनीचे संचालक सारंग वाकोडीकर तसेच सॉफ्टवेअर इंजिनिअर शहेबाज खान यांनी घेतलेल्या अहोरात्र परिश्रमांमुळे शक्य झाले आहे. या यशामध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्रातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नमूद केले आहे.
