नायगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे रातोळी कॅम्प येथील शेतशिवारात चोरट्यांनी धाडसी चोरी करत शेताच्या आखाड्यावर बांधलेले दोन बैल पळवून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अविनाश बापूराव माउलगे यांनी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, दिनांक २५ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास मौजे रातोळी कॅम्प येथील त्यांच्या शेत शिवारातील आखाड्यावर बांधलेले सुमारे ६० हजार रुपये किमतीचे दोन गोरे बैल अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पेदे हे करीत आहेत. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
