प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी पोस्ट विभागाचे कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण;घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा : जिल्हाधिकारी

 

नांदेड  : -भारताला सौरऊर्जेमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी डाक विभागाला अर्थात पोस्ट खात्याला देण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याच्या आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

शासनाच्या विविध योजनांसाठी विविध स्तरावरचे सर्वेक्षण सुरू असते. यामध्ये आता प्रधानमंत्री सूर्य घर योजना यासाठी पोस्ट विभाग गावागावात जाऊन सर्वेक्षण करणार आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून देशातील एक कोटी कुटुंबांना महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरविण्याचा शासनाचा उद्देश आहे. या योजनेद्वारे एक कोटी घरांना सवलतीच्या दरात सौर पॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी गावागावात पोस्ट खात्याचे कर्मचारी जाणार आहेत. तसेच पोस्टमन देखील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहे. त्यामुळे या योजने संदर्भात पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणात मदत करण्याचे आवाहन पोस्ट विभागाने केले आहे. जिल्हा प्रशासनाने देखील या योजनेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 

यासंदर्भात नांदेड विभागाचे डाक घर अधीक्षक राजीव पालेकर यांनी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे की, जास्तीत जास्त संख्येत या सर्वेक्षणात सहभागी व्हावे. या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेचा लाभ घेणारा मोठा जिल्हा म्हणून नांदेड पुढे येण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहे. वीज बिलामध्ये मोठी कपात या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक घरावर सौर पॅनल उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

नांदेड जिल्ह्यामध्ये एक मुख्य डाक घर, 53 उपडाकघर, 436 शाखा डाकघर, 775 पोस्टमन असा सर्व डोलारा पोस्ट विभागाचा आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेला यशस्वी करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे,असे आवाहनही राजीव पालेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!