सेवाभाव, समता आणि बंधुतेचा संदेश देणारी ‘लंगर सेवा’ ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचे वैशिष्ट्य, लाखो भाविकांनी घेतला सेवेचा लाभ

नांदेड –  ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य धार्मिक व ऐतिहासिक कार्यक्रमात लंगर सेवेच्या माध्यमातून सेवाभाव, समता व मानवतेचे अनोखे दर्शन घडत आहे. धर्म, जात, भाषा, प्रांत यांचा कोणताही भेद न करता हजारो भाविकांना एकत्र बसवून भोजन देणारी ही लंगर परंपरा या कार्यक्रमाची खरी आत्मा ठरते आहे.

हिंद-दी-चादर कार्यक्रमासाठी विविध राज्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्हयातून भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या भाविकांना मुख्य मंडपालगत उभारण्यात आलेल्या ८ मंडपाच्या माध्यमातून लंगर सेवा दिली जात आहे. लंगर सेवा ही केवळ भोजन व्यवस्था नसून मानवी समानतेचा आणि नि:स्वार्थ सेवेचा संदेश देणारी गौरवशाली परंपरा आहे. ‘सर्व मानव समान आहेत’ या तत्त्वावर आधारित ही सेवा हिंद-दी-चादर कार्यक्रमात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून, लाखो भाविक, साधुसंत, नागरिक, स्वयंसेवक आणि पाहुण्यांना भोजन देण्यात येत आहे.

स्वयंसेवकांचा सेवायज्ञ

या लंगर सेवेत शीख बांधवांसह विविध सामाजिक संस्था, युवक-युवती, महिला, स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. भाजी कापणे, पोळ्या तयार करणे, अन्न शिजवणे, स्वच्छता राखणे, पंगतीत सेवा करणे ही कामे प्रत्येक कामात ‘सेवा हीच साधना’ या भावनेतून स्वयंसेवक करीत आहेत. अनेक जण तर पहाटेपासून उशिरा रात्रीपर्यंत न थकता सेवा देत आहेत.

समतेचे प्रत्यक्ष दर्शन

लंगरमध्ये श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, वृद्ध-लहान असा कोणताही भेद नाही. सर्वजण एकाच पंगतीत, जमिनीवर बसून भोजन ग्रहण करतात. यामुळे सामाजिक समतेचे प्रत्यक्ष दर्शन भाविकांना घडत आहे.

नेटके व्यवस्थापन

जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून लंगर सेवेचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, शुद्ध पाणी, आरोग्य तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!