जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून आढावा

छत्रपती संभाजीनगर –  विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जिल्हानिहाय तयारीचा आढावा आज राज्य निवडणूक आयूक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला.

विभागात करण्यात आलेल्या निवडणुकांच्या तयारीबाबत समाधान व्यक्त करून मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडेल आणि मतदानाच्या टक्केवारीत आणखी वाढ होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी आणखी मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्याच्या सुचनाही सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिल्या.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,  राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव सुर्या कृष्णमुर्ती,  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ.विनय राठोड, परभणीचे पोलीस अधीक्षक विरेंद्रसिंह परदेशी, धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर प्रत्यक्ष उपस्थित होते. तर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक शहाजी उमाप, लातूर पोलीस अधीक्षक अमोल तांबे व सागर पाटील सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) महाराष्ट्र राज्य, मुंबई हे दुरदृष्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.

मतदानाविषयी जागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती(स्वीप)उपक्रमांचे श्री. वाघमारे यांनी कौतुक करत इतर जिल्ह्यांनीही  मतदार जनजागृती उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचेही निर्देश दिले. तसेच मतदान करण्याच्या प्रकियेविषयी मतदारांमध्ये विविध प्रसिद्धी माध्यमांतून जनजागृती करावी, वृध्द(वय 80 वर्षावरील), गरोदर महिला, दिव्यांग व्यक्ती यांना मतदान करणे सोयीचे होण्याच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात याव्यात. मतदार याद्यांतील दुबार मतदारसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने दुबार नाव नोंदणी असलेल्या मतदारांकडून संमंतीपत्रे भरून घेण्याचे काम गांभीर्याने करावे. त्याचबरोबर आचारसंहिता काळात प्रशासनाने केलेल्या कारवाईसही विविध माध्यमांव्दारे प्रसिद्धी देण्याच्या सूचना श्री. वाघमारे यांनी यावेळी दिल्या.

राज्य निवडणूक आयोग 2010 पासून मतदानावेळी मार्कर पेनची शाई वापरत आहे. परंतू यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी लोकसभा, विधानसभा निवडणूकीप्रमाणे ‘म्हैसूर शाईचा’ वापर करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया भयमुक्त व सुरक्षितरित्या पार पाडण्याच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी मतदारांच्या प्रमाणात पुरेसे मतदान केंद्रे, इव्हिएम मशीनची उपलब्धता, मतदान केंद्रावर मतदान अधिकारी व कर्मचारी यांची व्यवस्था, मतदान प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी यांचे आवश्यक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही, स्ट्राँगरूमची व्यवस्था व सुरक्षा करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे, याबाबत संगणकिय सादरीकरण केले.

 

मतदार  यांद्यांतील दुबार नावांच्याबाबत कारवाई करण्यात येऊन दुबार मतदारांकडून दुबार मतदान करणार नसल्याचे संमंतीपत्रे भरुन घेण्याची कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून सर्व राजकिय पक्षांशी संवादावर भर दिला जात आहे. तर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षकांसोबत वेळोवेळी बैठका व संवाद करण्यात येत असल्याचे सांगितले.

 

तसेच  सर्व  पोलीस अधीक्षक यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, भरारी पथके, स्थिर पथके, व्हिडिओ सर्वेक्षक पथके, वाँरंट बजावणी, अवैध्य मद्य विक्री वर कारवाई व कायदासुव्यस्थेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगून  मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी बंदोबस्तकामी मनुष्यबळाची  उपलब्धता व आवश्यकता  आदीबाबत माहितीचे संगणकिय सादरीकरण केले.

 

पोलीस महानिरिक्षक वीरेंद्र मिश्र, नांदेड विशेष पोलीस महानिरिक्षक शहाजी उमाप यांनीही जिल्ह्यांत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यस्था राखण्यात येत असल्याचे सांगत संवेदनशिल मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचे सांगितले.  जिल्ह्यांच्या सीमा भागात नाका बंदी करण्यात येत असून करण्यात आलेल्या व करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईसंदर्भात माहिती दिली. तसेच निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!