मागील बारा वर्षांपासून मुस्लिमांकडून हिंदूंना धोका आहे अशी भीती पद्धतशीरपणे पसरवली गेली. त्यासाठी कार्यक्रम राबवले गेले, घोषणा दिल्या गेल्या, मुघलांचा इतिहास पुसून टाकण्याचे प्रयत्न झाले. पण इतिहास हटवून टाकता येत नाही. तो इतिहासच असतो आणि इतिहासच राहतो.
आता मात्र मौनी अमावस्येपासून प्रयागराजमध्ये शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. भारतात एकूण चार शंकराचार्य आहेत स्वामी ;निश्चलानंदजी सरस्वती, स्वामी श्रीकृष्ण भारती, स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी श्री सदानंद महाराज. शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आध्यात्मिक पद मानले जाते. पण आज उत्तर प्रदेश सरकार त्यांनाच विचारत आहे, “तुम्ही शंकराचार्य आहात हे सिद्ध करा.” म्हणजे थेट देवाला सांगितले जात आहे तू देव आहेस हे दाखव.
यात काही चुकीचे आहे असे म्हणणे कठीण आहे का? यासोबतच, माजी शंकराचार्यांच्या वक्तव्यांतून गंभीर इशाराही मिळतो आहे. ही चेतावणी कुठल्या टप्प्यावर जाईल, हे आज सांगता येत नाही. मात्र येत्या १० मार्चला, तब्बल २२ वर्षांनंतर, चारही शंकराचार्य एकत्र येणार आहेत आणि ही बाब सरकारसाठी अस्वस्थ करणारी आहे.

मौनी अमावस्येपासून सुरू झालेल्या या “भगवा विरुद्ध भगवा” संघर्षाकडे दिल्ली गंमतीने पाहत होती. दिल्लीला वाटत होते की या गोंधळात योगी आदित्यनाथ यांना हटवता येईल. कारण त्यांचे उपमुख्यमंत्रीही त्यांच्याच विरोधात बोलताना दिसत आहेत. अनेक संत माफी मागण्याची मागणी करत आहेत, पण माफी मागण्यास मुख्यमंत्री तयार नाहीत. याचा अर्थ काय घ्यायचा? हे सर्व काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून घडत आहे आणि तेच अधिकारी मुख्यमंत्र्यांना चालवत आहेत, असा स्पष्ट संदेश यातून जातो.
उपमुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार लोकांवर कारवाई करण्याची भूमिका घेत आहेत. मुळात प्रसारमाध्यमांनी धार्मिक प्रकरणांपासून दूर राहायला हवे. पण इथे नेमके उलट घडते आहे. मीडिया या प्रकरणात तेल ओतण्याचे काम करत आहे. शंकराचार्यांना खोटे ठरवण्यासाठी जणू ती सरसावली आहे.

एका पत्रकाराने शंकराचार्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि विचारले, “तुम्ही उपोषणात असताना जेवण केले होते का?” त्यावर शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितले की अमावस्या पूर्ण होईपर्यंत स्नान झाल्याशिवाय आम्ही भोजन करत नाही. अमावस्या संपल्यानंतरच आम्ही भोजन केले. या स्पष्टीकरणाकडे दुर्लक्ष करून एका पत्रकाराने “गपचूप खाऊन टाकले” अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली. म्हणजे थेट शंकराचार्य नाटक करत होते, असा खोटा कथानक रचण्याचा प्रयत्न झाला.
या सगळ्या घटनाक्रमातून एकच गोष्ट स्पष्ट होते सरकारला असे सनातनी हवेत जे ‘हो’ म्हणतील. जे सरकारच्या विरोधात बोलतात, ते सनातनी सरकारला नको आहेत. अनेक पत्रकार, अनेक लोक रस्त्यावर फिरून जनतेला भडक प्रश्न विचारत आहेत. पण या सगळ्यात सामान्य जनता संतप्त आहे. अनेकजण उघडपणे सांगत आहेत की भारतीय जनता पार्टीला मतदान देणे ही मोठी चूक झाली.आज शंकराचार्यांना टार्गेट करणारे आवाजही देश पाहतो आहे आणि शंकराचार्यांच्या बाजूने उभे राहणारे आवाजही देश पाहतो आहे. मग पुढे काय होणार? हा प्रश्न उभा राहतो आहे. “भगवा विरुद्ध भगवा” या संघर्षाचा शेवट काय होईल, हे आज सांगता येणार नाही. पण काहीतरी वाईट घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हीच खरी भीती आहे.

