नांदेड – मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षी आठ व्यक्तिंची निवड झाली असून यात कादंबरीकार मोतीराम राठोड, आंबेडकरवादी विचारवंत प्रा. डॉ. आनंद इंजेगांवकर, ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते, कवयित्री प्रतिभा पांडे, पत्रकार पांडुरंग सोनकांबळे, कवयित्री सोनाली बेले, प्रा.शेख शेहनाज, गझलकार चंद्रकांत कदम यांची तर अक्षरोदय साहित्य मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांत भीमशाहीर माधवदादा वाढवे आणि ज्येष्ठ कवयित्री विमलताई शेंडे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, राज्यस्तरीय पुरस्कार निवड समिती प्रमुख तथा येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, अक्षरोदयचे कार्याध्यक्ष सदानंद सपकाळे यांनी आज येथे घोषणा केली. यावेळी अनुरत्न वाघमारे, माजी उपप्राचार्य प्रल्हाद हिंगोले, कैलास धुतराज, शंकर गच्चे, चंद्रकांत चव्हाण यांच्यासह प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
अक्षरोदय साहित्य मंडळ आणि मातोश्री भागाबाई प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, साहित्य आदी क्षेत्रांतील महिला व पुरुष यांना पुरस्कार दिले जातात. आजपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांना हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रतिष्ठेचे मानले जात असून यावर्षी बंजारा साहित्यरत्न पुरस्कार मोतीराम राठोड यांना, ज्ञानप्रबोधन समाज भूषण पुरस्कारासाठी प्रा. डॉ. आनंद इंजेगांवकर, उत्कृष्ट वाङमय भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते, मातोश्री भागाई स्मृती पुरस्कार कवयित्री प्रतिभा पांडे, क्रांतीज्योती सावित्रीबाई काव्यभूषण पुरस्कार कवयित्री सोनाली बेले, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पांडुरंग सोनकांबळे, फातिमा शेख स्त्रीशिक्षण गौरव पुरस्कार प्रा. शेहनाज शेख, इलाही जमादार गझलरत्न पुरस्कार सुप्रसिद्ध गझलकार चंद्रकांत कदम तर अक्षरोदयच्या वतीने कालवश स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलकाका जोंधळे स्मृतीपुरस्कार क्रांतिकारी भीमशाहीर माधवदादा वाढवे यांना आणि स्मृतिशेष दीपक सपकाळे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री विमलताई शेंडे यांना देऊन गौरवण्यात येणार आहे. सदरील पुरस्कार रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरातील महावीर सोसायटी, संवाद सभागृह, डॉ. विजयकुमार माहुरे यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात येणार असून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठान व अक्षरोदय साहित्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
