नांदेड – जीवन सरळ रेषेत चालत नाही ते वळणावळणांचे असते. वळण आले की थांबायचे नसते, तर वळण घेऊन पुढे जायचे असते. हे केवळ तत्वज्ञान नाही, तर अनुभवातून आलेले वास्तव आहे आणि ते वास्तव शब्दांत मांडले आहे राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयातील कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज कुमार शर्मा यांनी.
आजच्या काळात सुखालाच यश समजण्याची आणि दुःखाला अपयश ठरवण्याची सवय समाजाने लावून घेतली आहे. पण सुख-दुःख हे जीवनाचे दोन चाकं आहेत; एक नसेल तर गाडी चालत नाही, हे वास्तव डॉ. शर्मा ठामपणे अधोरेखित करतात. जीवनातील थरारक प्रसंग मग ते आनंदाचे असोत वा वेदनेचे हेच माणसाला घडवत असतात. संकट टाळून कोणी मोठा होत नाही; संकट पचवूनच माणूस उभा राहतो. नांदेड दौऱ्यावर आलेले डॉ. शर्मा हिंद- दि – चादर कार्यक्रमाचे सुरक्षा प्रमुख होते. मात्र निवडणूक आयोगाच्या तातडीच्या बैठकीमुळे त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. निवडणूक काळात समन्वयक अधिकारी म्हणून काम करताना वेळेवर निर्णय आणि तटस्थ भूमिका हेच त्यांचे खरे शस्त्र आहे.
नांदेडशी त्यांचे नाते कागदावरचे नाही, तर मातीशी जोडलेले आहे. 2005 साली याच जिल्ह्यातून त्यांच्या पोलीस सेवेला सुरुवात झाली. आज 21 वर्षांच्या सेवेनंतर मागे वळून पाहताना त्यांच्या शब्दांत अनुभवाचा भार जाणवतो. या वर्षांत अनेक थरारक प्रसंग पाहिले. पण ते प्रसंग माझ्या वाटेतले काटे नव्हते; ते माझे गुरू होते, असे सांगताना ते जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकतात.
चूक झाली, अपयश आले तर समाज आधी दोषारोप करतो. पण डॉ. शर्मा वेगळा विचार मांडतात कधी कधी दोष नशिबावर टाकला तर मन शांत राहते आणि पुढे जाण्याची ताकद मिळते. हा पलायनवाद नाही, तर मानसिक समतोल राखण्याची शहाणी भूमिका आहे. ते निवडीबाबतही अत्यंत परखड आहेत. प्रत्येकाला निवड करण्याचा अधिकार आहे. नोकरीची, जोडीदाराची, मित्रांची. पण निवड केल्यानंतर तिचे गुण-दोष स्वीकारण्याची हिंमत लागते. ती हिंमत नसेल तर दुःख अटळ आहे, हा सल्ला आजच्या अस्थिर नातेसंबंधांच्या काळात आरसा दाखवणारा आहे.
गडचिरोलीसारख्या संवेदनशील भागात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी मृत्यूला अगदी जवळून पाहिले. अनेक मृतदेह मी खांद्यावर उचलले. पण त्या प्रसंगांनी मला तोडले नाही; त्यांनी मला घडवले, असे सांगताना जखम झाली तरी त्यातून शहाणपण मिळाले, तर ती जखम सोन्यासारखी असते, ही म्हण सार्थ ठरते.चंद्रपूर, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर, मुंबई आणि पुढे सीआयएसएफसारख्या केंद्रीय संस्थेतील जबाबदाऱ्या हा प्रवास केवळ पदांचा नाही, तर परिपक्वतेचा आहे. आज विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून काम करताना त्यांनी पाहिलेला प्रत्येक रस्ता, प्रत्येक वळण अनुभवातूनच आलेले आहे.
रस्ता कधी स्वतः वळत नाही; वळण आपल्यालाच घ्यावे लागते, हे त्यांचे विधान म्हणजे जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. अडचणी आल्या म्हणून मागे फिरणे सोपे असते, पण त्यावर मात करून शेवट गाठण्यातच जीवनाचा अर्थ आहे. कारण अडचणी चुकवून नव्हे, तर अडचणी पार करूनच माणूस मोठा होतो. नांदेडमधील अवघ्या 11 तासांच्या वास्तव्यात लोकांची भेटीसाठी लागलेली गर्दी हेच सांगून जाते माणूस पदामुळे नाही, तर वर्तनामुळे मोठा ठरतो. प्रत्येकाला वेळ देणारा अधिकारी, वर्तमान क्षणाचा आनंद घेणारा अनुभवसंपन्न व्यक्ती हे दृश्य दुर्मिळ आहे.
आपले कामच आपली ओळख ठरवते. परिस्थितीवर आपण कशी प्रतिक्रिया देतो, त्यावर सन्मानही मिळतो आणि नकारही, असे सांगत डॉ. शर्मा शेवटी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडतात सन्मान पेलण्याइतकीच ताकद नकार पेलण्याचीही हवी.खरंच, अनुभव हा असा गुरू आहे जो आधी परीक्षा घेतो आणि नंतर शिकवतो,” आणि डॉ. मनोज कुमार शर्मा यांचा संपूर्ण प्रवास याच गुरूची जिवंत साक्ष देतो.
- कंथक सूर्यतळ
