नांदेड (प्रतिनिधी)-अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही ट्रॅक्टरची एकूण किंमत पोलिस दप्तरी २ लाख ८० हजार रुपये इतकी नोंदविण्यात आली आहे. याप्रकरणी अर्धापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रामराव उत्तमराव पावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मौजे शैली चिंचबन शिवारातील शेत गट क्रमांक ५ मधून दिनांक १८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ते १९ जानेवारी रोजी पहाटे ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन ट्रॅक्टर चोरून नेले. यामध्ये ट्रॅक्टर क्रमांक MH-26 BQ 9665 (किंमत १ लाख ५० हजार रुपये) तसेच दुसरा ट्रॅक्टर क्रमांक MH- 26 BQ 4032 (किंमत १ लाख ३० हजार रुपये) असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४/२०२६ दाखल करण्यात आला असून पोलिस अंमलदार गौरकर पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, नांदेड शहरातील सिडको भागात असलेल्या एमआयडीसी परिसरातील लोकमत प्रिंटिंग प्रेस कार्यालय परिसरातही चोरीची घटना घडली आहे. दिनांक १८ जानेवारी रोजी रात्री ११.५० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी सोलार पॅनलचे केबल कापून नुकसान केले असून सुमारे १२ हजार रुपये किमतीचे केबल चोरून नेले आहे.या संदर्भात किरण शिवराम कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस अंमलदार देवडे करीत आहेत.
