भारतीय संस्कृतीचा गौरव- श्री गुरु तेगबहादुर साहिब

‘हिंद दी चादर’, म्हणजेच भारतभूमीचे कवच, अशी शीखांचे नववे गुरु तेगबहादुर साहिब यांची जगाला ओळख आहे. गुरु तेगबहादुर साहिब यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेगबहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने नागपुरातील यशस्वी आयोजनानंतर आता नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी रोजी भव्य अशा आध्यात्मिक समागम कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. या निमित्ताने गुरु तेगबहादुर साहिब यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख….

सत्याचा मार्ग आणि अहिंसेचे तत्त्व हे भारतीय विचारांचे एक अविभाज्य अंग आहे. हे तत्त्व केवळ शारीरिक हिंसा न करण्याइतपत मर्यादित नसून, अगदी मनातही कोणाबद्दल द्वेष बाळगू नये, असा त्याचा व्यापक अर्थ आहे. भारतीय संस्कृतीने जगाला विविधतेत एकता जोपासण्याचा मंत्रही दिला. ‘एकम सत् विप्रा बहुधा वदंती’ म्हणजेच सत्य एकच आहे, परंतु विद्वान लोक ते वेगवेगळ्या प्रकारे मांडतात, हे ऋग्वेदातील सूत्र भारतीय संस्कृतीतील धार्मिक सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांचा मूळ आधार मानले जाते. जिथे पाश्चात्य संस्कृती उपभोगावर भर देते, तिथे भारतीय संस्कृती त्याग आणि बलिदानाला महत्त्व देते. या मूळ विचारांचे स्मरण येथील जनसमुदायाला सातत्याने करून देण्यासाठी अनेक महापुरुषांनी या भारतभूमीत जन्म घेतला. जगाला समता, सेवा आणि भक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या शीख समुदायाच्या तेजस्वी परंपरेत जन्मलेले गुरु तेगबहादुर साहिब हे अशाच महापुरुषांपैकी आहेत.
गुरु तेगबहादुर यांचे बलिदान हा भारतीय मध्ययुगीन इतिहासातील समर्पणाच्या भावनेचा महत्त्वपूर्ण आणि शाश्वत अध्याय ठरतो. श्री गुरु नानकदेव असोत, श्री गुरु तेगबहादुर साहिब असोत की श्री गुरु गोविंद सिंह साहिब असोत, या साऱ्या महापुरुषांनी परकीय जुलूमशाहीच्या काळात भारतभूमीतील जनतेचे स्वत्व, आत्मसन्मान जागविण्याचे तसेच दिशाहीन समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे श्री गुरु तेगबहादुर साहीब यांचे स्मरण झाले की आजही त्यांचे विचार आणि मानवतेसाठी त्यांनी दिलेल्या बलीदानाचा इतिहास डोळ्यापुढे सरकतो.

जन्म आणि पार्श्वभूमी

गुरु तेगबहादुर साहिब यांचा जन्म १६२१ मध्ये अमृतसर येथे शीखांचे सहावे गुरु श्री हरगोविंद साहिब यांच्या घरी झाला. गुरु हरगोविंद साहिब यांच्या पाच पुत्रांपैकी ते धाकटे होते. ते अध्यात्मिक रंगात रंगलेले, अंतर्मुख आणि मौनप्रिय होते. गुरुपदाच्या गादीची जबाबदारी स्वीकारल्यावर गुरु तेगबहादुर साहिब यांनी शीख समाजाला संघटित करण्याचे प्रयत्न सुरु केले. १६६५ च्या सुमारास त्यांनी आनंदपूर नावाचे स्थळ वसवले. पुढे ते ‘आनंदपूर साहिब’ म्हणून प्रचलित झाले. शीख धर्मातील अत्यंत पवित्र अशा स्थळांपैकी ते एक मानले जाते. गुरु तेगबहादुर साहिब यांनी तत्कालीन बंगाल, बिहार, आसामसह देशातील अनेक भागांना भेटी देऊन आपल्या विचारांचा प्रचार–प्रसार केला. १६६६ मध्ये पाटणा (पाटणा साहिब) येथेच त्यांच्या घरी गुरु गोविंदसिंह यांचा जन्म झाला. ते शीखांचे दहावे गुरु होत.

साहित्य, उपदेश आणि आध्यात्म

गुरु तेगबहादुर साहिब हे केवळ धर्मगुरुच नव्हते, तर ते उत्तम साहित्यिक आणि रचनाकारही होते. त्यांनी आपल्या अनेक रचनांच्या माध्यमातून शीख तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. सहज सोप्या भाषेसह त्यांचा भावप्रवाह अतिशय सशक्त आहे. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू प्रामुख्याने वैराग्य, नाम ‘सिमरन’ (देवाचे स्मरण) आणि जीवनातील नश्वरता हाच ठरतो. त्यांचे विवेचनाचे विषयही धार्मिक, तत्त्वमिमांसक आणि जीवनातील क्षणभंगुरता दर्शवणारे आहेत. गुरु तेगबहादुर साहिब यांच्या रचनांना गुरु ग्रंथ साहिबमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या रचनांना सामान्यतः ‘शबद’ किंवा भजन म्हटले जाते. ज्यांत ईश्वर, मानवी संबंध, सेवा, मन–शरीर, मृत्यु, प्रतिष्ठा आणि मानवी स्थिती यांसारख्या विषयांचा व्यापक आवाका आढळून येतो.

संघर्षाचा कालखंड

गुरु तेगबहादुर सिंह साहीब यांच्या जीवनकार्याचा हा कालखंड भारतीय इतिहासातील अत्यंत आव्हानात्मक असा काळ मानला जातो. परकीय आक्रमकांनंतर दाखल झालेल्या तत्कालीन शासकांची सत्ता भारताच्या बऱ्याच भागात स्थिरावली होती. या सत्तेच्या कट्टरतेचा आणि आक्रमक विस्ताराचा असा काळ होता. मध्ययुगातील हाच काळ तत्कालीन शासकांच्या जुलमी राजवटीचाही मानला जातो. सत्ताधीश हे धार्मिकदृष्ट्या संकीर्ण आणि अत्यंत कडव्या मनोवृत्तीचे होते, असे इतिहास सांगतो. त्यामुळे स्वाभाविकपणे अन्य समुदायांसाठी हा काळ अतिशय खडतर आणि अस्थिरतेने परिपूर्ण असा काळ मानला जातो. अशा या प्रतिकूल परिस्थितीत गुरु तेगबहादुर यांनी अत्याचाराचा प्रतिकार अत्याचाराने नव्हे तर त्यागाने केला.

सर्वोच्च बलिदान

गुरु तेगबहादुर साहीब यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा अध्याय म्हणजे त्यांचे सर्वोच्च बलिदान. साधरणतः १६७५ सालचा तो काळ होता. सत्ताधाऱ्यांच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या काश्मिरी पंडिताचे काही प्रतिनिधी आनंदपूर साहीब येथे गुरु तेगबहादुरांकडे मदत मागण्यासाठी आले होते. या लोकांना सक्तीने धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात होते. काश्मिरी पंडितांची ही व्यथा ऐकून गुरु तेगबहादुर साहीब अतिशय धीरगंभीर झाले होते. अशा संकटापासून वाचण्यासाठी आता बलिदानाची गरज आहे, असे उत्तर त्यांनी यावर दिले. ‘जर आमच्या गुरुंनी धर्मांतर केलं, तर आम्ही सर्व स्वतःहून तुमचा धर्म स्वीकारू’, असे सत्ताधीशाला जाऊन सांगण्याची सूचना त्यांनी काश्मिरी पंडितांना केली. पुढे गुरु तेगबहादुर साहीब हे दिल्लीला पोहचल्यावर बादशहाने त्यांना कैद केले. त्यांना प्रलोभने दाखविली गेली, धर्म स्वीकार करण्यास सांगण्यात आले. गुरुजींनी या दोन्ही गोष्टी नाकारल्या. त्यांच्या समक्षच त्यांच्या शिष्यांना शहीद करण्यात आले. पण, गुरु तेगबहादुर साहीब हे आपल्या निश्चयापासून अजिबात ढळले नाहीत. त्यांनी बादशहाचे आदेश मानण्यास नकार दिला. संतापलेल्या बादशहाने त्यांचे शीर धडावेगळे करण्याचे आदेश दिले. तो आदेश अखेर अंमलात आणला गेला. गुरु तेगबहादुर साहीब यांचे सर्वोच्च बलिदान ज्या ठिकाणावर झाले, ते ठिकाण आज दिल्लीच्या चांदणी चौक परिसरातील ‘सीस गंज साहिब’ गुरुद्वारा म्हणून ओळखले जाते.
‘जर माझ्या बलिदानानं निरपराध लोकांच्या श्रद्धेचं रक्षण होणार असेल, तर तेच माझं सर्वोच्च धर्मकार्य ठरेल’, असा संदेश त्यांनी त्यावेळी दिला होता. हे शब्द केवळ त्यागाचे नव्हते, तर संपूर्ण मानवतेच्या रक्षणाची घोषणा करणारे होते. धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेची सर्वोच्च मूल्य जपण्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला होता. ‘सीस गंज साहिब’ गुरुद्वारा आजही त्यांचा त्याग आणि मानवतेप्रती समर्पणाची साक्ष देतो.

मानवतेचा संदेश

शीखांचे गुरु असूनही गुरु तेगबहादुर साहीब यांनी देशाचे रक्षण करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते. ते सर्व धर्मांना समान मानणारे होते. सर्व मानव हे एकाच परमात्म्याचे पूत्र आहेत, अशीच त्यांची शिकवण होती. धर्म म्हणजे कर्तव्य आणि आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे, हा संदेश त्यांनी समस्त मानवजातीला दिला आहे. त्यांचा हा संदेश आजही प्रासंगिक ठरतो.

रमाकांत दाणी,
प्रसिद्धी समन्वयक,
संचालक माहिती व जनसंपर्क कार्यालय,नागपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!