नांदेड/हिंगोली (प्रतिनिधी)- नांदेड येथील पोलीस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात दोन ठिकाणी छापे टाकून तब्बल ७३ लाख रुपयांचा गुटखा तसेच एकूण एक कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई आज पार पडली. नांदेड व हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किंवा स्थानिक गुन्हे शाखा कार्यरत नसल्याने ही कारवाई करावी लागल्याची चर्चा आहे.
नांदेडचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ तालदेवार यांच्यासह पाच पोलीस अमलदारांचे पथक आज पहाटे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे रवाना करण्यात आले. या कारवाईत तीन चारचाकी वाहनांमधून १४ लाख ६७ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला, तसेच दहा लाख रुपयांची तीन चारचाकी वाहनेही ताब्यात घेण्यात आली. आखाडा बाळापूर येथील या प्रकरणात सदाशिव अवचार (वय २०, रा. भुशी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) आणि प्रभाकर दिगंबर अवचार (वय ३२, रा. भुशी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) यांच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात २ जून २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे करीत आहेत.

या कारवाईनंतर त्याच पथकाने नांदेड शहरातील इतवारा भागात गुटखा साठवणूक केलेल्या एका गोदामावर छापा टाकून ५८ लाख २६ हजार रुपयांचा गुटखा व इतर साहित्य जप्त केले. या साहित्याची किंमत २० लाख ५० हजार रुपये असून, एकूण ७८ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.देगलूर नाका भागातील या प्रकरणात शेख जिब्रान शेख मुखीद (वय २६, रा. देगलूर नाका) आणि गणेश रामराव कराळे (वय २६, रा. तिरुपती नगर, धनेगाव) यांच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोन्ही ठिकाणी झालेल्या छाप्यांमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने ७२ लाख ९३ हजार रुपयांचा गुटखा, तीन चारचाकी वाहने आणि एक ट्रक असा एकूण एक कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या संपूर्ण कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ तलदेवार यांच्यासह पोलीस अमलदार प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी विशेष मेहनत घेतली. या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अमलदारांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.आरोपींना हा अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणखी कोणाचे पाठबळ आहे का, याचा शोध घेतला जात असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात किंवा पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयात, तसेच “डॅश-डॅश” या संकेतस्थळावर किंवा “खबर” या डॅश-डॅश हेल्पलाइनवर कळवून अवैध व्यवसायांच्या उच्चाटनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात दोन ठिकाणी गुटखा जप्त केला असला, तरी गुटखा खरोखरच बंद झाला आहे का, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. या प्रश्नावर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना कोण जाब विचारणार, हा देखील तितकाच मोठा मुद्दा असून, तो आम्ही जनतेसमोर मांडत आहोत.

या कार्यवाहीने गुटखा संपणार काय शहाजी राजे
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती पुढे आणावी, आणि त्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. मात्र, या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी जनतेनेही सजग राहणे आणि आवश्यक तयारी ठेवणे गरजेचे आहे, असे आम्हाला सांगायचे आहे.
