भारतीय जनता पार्टीचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकावला, हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र हे चित्र जितके सरळ दिसते, तितके ते सोपे नाही. कारण शिवसेना (एकनाथ शिंदे गट)चे चार नगरसेवक प्रत्यक्षात त्यांच्या प्रभावाखाली असल्याचे बोलले जाते. याशिवाय अपक्ष म्हणून निवडून आलेला एक नगरसेवकही एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात काम करून जिंकलेला असल्याने तोही याच गटात गणला जातो.
या निवडणुकीत एकूण MIM चे 13 नगरसेवक निवडून आले आहेत. 2012 मध्ये हा आकडा 12 वर थांबला होता. आता एकाने वाढलेला हा आकडा नेमका कुणामुळे वाढला, त्या 13 व्या सदस्याला मार्ग कोणी दाखवला, याचे उत्तर शोधले असता एकच शक्यता ठळकपणे समोर येते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळू नये, यासाठी ही संपूर्ण राजकीय खेळी रचण्यात आली.
आजही ही खेळी यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे 12 आणि वंचित बहुजन आघाडीचे 5 असे एकूण 17 नगरसेवक आहेत. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चा एक सदस्यही यात सामील झाला, तर ही संख्या 19 पर्यंत जाऊ शकते. मात्र राजकारणात भविष्याचा अचूक अंदाज बांधणे अवघड असते; म्हणूनच आज ठाम निष्कर्ष काढणे धाडसाचे ठरेल.
तथापि, एक गोष्ट निर्विवाद आहे भारतीय जनता पार्टीला आजवर कधीही नांदेड महानगरपालिकेवर थेट सत्ता मिळाली नव्हती. खासदार अशोक चव्हाण यांच्या भूमिकेमुळे ते शक्य झाले आणि हा पक्षासाठी नक्कीच आनंदाचा क्षण आहे. पक्षातील काही मोजके लोक वगळता अनेक जुने चेहरे मागे पडले आहेत आणि जे सध्या सत्तेच्या आसपास आहेत, ते मूग गिळून गप्प असल्याचेही दिसते.
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 20 प्रभागांतील 81 नगरसेवकांची यादी काल जाहीर झाली. त्यानुसार भाजप 45, एमआयएम 13, काँग्रेस 12, वंचित बहुजन आघाडी 5, शिवसेना (शिंदे गट) 4, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 1 आणि अपक्ष 1—असा एकूण आकडा 81 होतो.
2012 साली नांदेड जिल्ह्यात एमआयएमचा प्रभाव वाढू लागला तेव्हा अनेक दहशतवादी गुन्हे त्यांच्या नावावर नोंदवले गेले होते. तरीही पुढे एमआयएम जवळपास संपुष्टात आली होती, कारण त्यांच्या 12 नगरसेवकांपैकी सहा काँग्रेसमध्ये गेले आणि पुन्हा निवडून आले. मात्र या निवडणुकीत एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले काँग्रेसचे नगरसेवक रात्री तीन वाजता खासदार अशोक चव्हाण यांना भेटले आणि दुसऱ्याच दिवशी एमआयएममध्ये गेले. त्यांना एमआयएमची तिकिटे मिळाली आणि ते निवडूनही आले.याचा अर्थ लोकांना कळत नाही की लोकांनी तो अर्थ समजूनही दुर्लक्ष केले, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. मात्र एक गोष्ट निश्चित कौल लागलेला आहे आणि त्या कौलाला कोणीही नाकारू शकत नाही. त्याच कौलानुसार पुढील कारभार चालणार आहे.
वाढलेली किंवा वाढवलेली ही संख्या सूचित करते की याची तयारी महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेपासूनच सुरू होती. काही प्रभागांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या अधिक असल्याने त्याचा फटका इतरांना बसला. तो फटका आपल्याला बसू नये, म्हणूनच ही अंतर्गत राजकीय खेळी रचली गेली असावी. मात्र यावर आम्ही भाष्य केले, तर देशद्रोहाचा शिक्का मारला जाण्याची परंपरा मागील अकरा वर्षांपासून सुरू आहे. आता त्याची झलक नांदेडमध्येही दिसू लागली आहे.
राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांपैकी 25 महानगरपालिकांवर भाजपने आपला ताबा मिळवला आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत ‘प्रत्येक ठिकाणी आपलीच सत्ता’ हा खेळ सुरू आहे. दुसऱ्याला सत्तेच्या वाटेला उभेही राहू द्यायचे नाही, ही भूमिका मागील अकरा वर्षांपासून सातत्याने राबवली जात आहे आणि आज ती महानगरपालिका स्तरावर जवळपास यशस्वी झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाचा आणि दुर्लक्षित घटनाक्रम म्हणजे प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदानासाठी जात असताना खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्ते फेरोज यांना म्हटले, “फेरोज भाई, आजपर्यंत खूप साथ दिलीत, पुढेही द्या.” त्यावर फिरोज यांनी दिलेले उत्तर, “साहेब, आपण जुने काँग्रेसचे व्यक्तिमत्त्व आहात. आजही काँग्रेसलाच मतदान करा,” हा या निवडणुकीतील सर्वात बोलका प्रसंग आहे. बहुधा हा घटनाक्रम अनेकांना माहीत नाही, म्हणूनच तो आज प्रसिद्ध करण्यात येत आहे. या संवादाचा अर्थ काय, त्यामागचा संदर्भ काय, याचे विश्लेषण वाचकांनी स्वतः करावे, अशी आमची विनंती आहे.
आता पुढील लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे लागले आहे. फेब्रुवारी महिन्यात नांदेड जिल्हा परिषदेसह राज्यातील अनेक जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका पार पडणार आहेत. नांदेड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 16 पंचायत समिती व ग्रामपंचायती जिंकण्याचे लक्ष्य खासदार अशोक चव्हाण यांनी उघडपणे बोलून दाखवले आहे.मग प्रश्न पुन्हा उभा राहतो त्यात यश येईल का? यश मिळवण्याची पूर्ण क्षमता खा.अशोक चव्हाण यांच्याकडे आहे, आणि ते यश मिळवतीलही. मात्र मिळवलेल्या त्या यशाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व्हावा, हीच आमची अपेक्षा आणि इच्छा आहे.
