कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होईल – प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन

नांदेड – बँक किंवा सहकारी संस्थांनी स्वतःला सातत्याने अद्यावत ठेवणे हे विकासाचे लक्षण असून, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे सक्षम करणे हा सामाजिक विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आधारित साधनांचा प्रभावी वापर केल्यास बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होईल, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी केले.
ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड येथील गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित AI प्रशिक्षण कार्यकारी विकास कार्यक्रमाच्या (Executive Development Program) अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सोसायटीचे सेक्रेटरी श्री. रवींद्र रक्ते, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, श्री. हर्षद शहा, डॉ. शैलेश वाडेर, डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, श्री. ऋषिकेश कोंडेकर, डॉ. रूपाली जैन, डॉ. कृष्णा चैतन्य आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वारातीम विद्यापीठात आधुनिक बँकिंगसाठी AI साधनांवर कार्यकारी विकास कार्यक्रमांमध्ये आधुनिक बँकिंग व्यावसायिकांसाठी AI साधने या विषयावर बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या पुढाकाराने आणि गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नांदेड यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बँकिंग क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आधुनिक साधनांची ओळख करून देणे व त्यांच्या प्रत्यक्ष उपयोगाबाबत मार्गदर्शन करणे हा आहे.
कार्यक्रमात DeepSeek, NotebookLM आणि TwinMind या अत्याधुनिक AI साधनांची माहिती देण्यात आली.
DeepSeek च्या माध्यमातून डेटा सुरक्षा, मोठ्या दस्तऐवजांचे विश्लेषण आणि दैनंदिन बँकिंग कामकाज सुलभ करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
NotebookLM द्वारे संशोधन, माहिती संकलन आणि स्रोताधारित निष्कर्ष कसे काढावेत यावर प्रशिक्षण देण्यात आले.
TwinMind प्रणालीद्वारे केंद्रीकृत ज्ञानसंचय निर्माण करणे, माहितीतील परस्परसंबंध समजून घेणे आणि व्यवस्थापन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.
या उपक्रमामुळे बँकिंग क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांची डिजिटल कौशल्ये वृद्धिंगत होतील, निर्णयप्रक्रिया अधिक प्रभावी व पारदर्शक बनेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी कळसकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!