बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीपल्स महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम;५०० विद्यार्थ्याचा सहभाग

नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालय व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 बाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

या अनुषंगाने या उपक्रमांतर्गत पिपल्स हायस्कूल, नांदेड येथे काल आयोजित कार्यक्रमात बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंध कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचा किंवा 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा विवाह होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित दोन्ही कुटुंबांवर, विवाहासाठी व्यवस्था करणाऱ्या (बँड वाजविणारे, मंगल कार्यालय चालक इ.) तसेच विवाहात सहभागी असणाऱ्या सर्व व्यक्तींवर या कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येते.

या कायद्यानुसार दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास व एक लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच बालविवाहाबाबत माहिती मिळाल्यास 1098 या टोलफ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. संपर्क करणाऱ्याची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाते, यावरही त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमास पिपल्स हायस्कूलमधील सुमारे 500 शालेय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिपल्स हायस्कूलच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सेलमोकर यांचे तसेच शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!