बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश;मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांना वयाची कागदोपत्री पडताळणी बंधनकारक

नांदेड –  बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांना कडक निर्देश जारी केले आहेत.

या निर्देशांनुसार कोणत्याही मंगल कार्यालयात किंवा धार्मिक स्थळी विवाह सोहळा आयोजित करताना वधूचे वय किमान १८ वर्षे व वराचे वय किमान २१ वर्षे पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. विवाहास परवानगी देताना आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नसून जन्माचा दाखला किंवा शालेय कागदपत्रे – जसे की बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला अथवा प्रवेश-निर्गम उतारा – यांच्या आधारेच वयाची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात अनेक प्रकरणांमध्ये आधार कार्ड व शैक्षणिक कागदपत्रांमधील जन्मतारखेत तफावत आढळून येत असल्याने बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणताही बालविवाह होऊ नये यासाठी मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांनी विशेष दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने नमूद केले आहे.

तसेच कायदेशीर विवाहाचे वय पूर्ण नसल्यास विवाहासाठी जागा देण्यास नकार देणे बंधनकारक असून, या संदर्भातील सूचना फलक मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविवाहास चालना देणे, परवानगी देणे अथवा कोणत्याही प्रकारची सेवा पुरविल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास ग्रामीण भागात ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक), शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नांदेड किंवा चाइल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बालविवाहमुक्त नांदेड जिल्हा घडविण्यासाठी नागरिकांचे, मंगल कार्यालयांचे व धार्मिक संस्थांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत “बेटी बचाओ, बेटी पढाओ” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!