काँग्रेसला सोडचिट्टी देत भवरे दाम्पत्याचा भाजपमध्ये प्रवेश; प्रभाग क्रमांक सहामधील नागरिकांचा तीव्र विरोध

नांदेड –नांदेड महापालिकेच्या राजकारणात खळबळ उडवणारी घडामोड समोर आली असून माजी महापौर शीला किशोर भवरे आणि माजी नगरसेवक किशोर भवरे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अनेक वर्षे काँग्रेसच्या सत्तेचा लाभ घेतलेल्या भवरे कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेसमध्ये निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या किशोर भवरे यांना काँग्रेस पक्षाने दोन वेळा नगरसेवक तर एक वेळा महापौरपद दिले होते. मात्र, त्या पक्षाशी असलेली निष्ठा बाजूला सारत त्यांनी आता भाजपचे कमळ हाती घेतले आहे.

दरम्यान, भवरे कुटुंबाच्या कार्यपद्धतीवर प्रभाग क्रमांक सहामधील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या आरोपानुसार, किशोर भवरे महापौर असताना त्यांनी आपल्या प्रभागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. प्रभागातील नागरिक समस्या घेऊन गेले असता, “माझा या प्रभागाशी काही संबंध नाही, मी उमरखेड विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे” असे म्हणत कार्यकर्त्यांना हाकलून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मागील पंधरा वर्षांपासून प्रभाग क्रमांक सहामधील नागरिकांनी भवरे कुटुंबावर विश्वास ठेवून सत्ता दिली. मात्र, त्या सत्तेचा उपयोग विकासासाठी न होता सत्तेचा माज आणि मस्ती यासाठीच झाला, असा आरोप नागरिक करत आहेत. केवळ पैशाच्या जोरावर निवडणुका लढवणे आणि जिंकणे हाच भवरे यांचा समज असल्याची टीकाही होत आहे.

प्रभागात आजही रस्ते, नाल्या, बंद पथदिवे, तुंबलेल्या गटारी, अस्वच्छ पाणी, अपुरा पाणीपुरवठा अशा मूलभूत समस्या कायम आहेत. आरोग्य सुविधांसाठी एकही रुग्णालय नाही. महापालिकेच्या विविध योजना आणि सुविधा गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, भवरे कुटुंब भाजपकडून उमेदवारी मागत असल्याची चर्चा सुरू असतानाच, प्रभाग क्रमांक सहामधील नागरिकांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “अकार्यक्षम माजी महापौरांना उमेदवारी देऊ नये,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

केवळ जातीचे आणि मतांचे राजकारण करून सत्तेत येण्याचा प्रयत्न केला, कार्यकर्त्यांना बळ न देता केवळ स्वतः आणि कुटुंबापुरतेच लक्ष केंद्रित केले, असा आरोप करत प्रभाग क्रमांक सहामधील नागरिकांनी येणाऱ्या निवडणुकीत भवरे कुटुंबाला मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!