नांदेड (प्रतिनिधी)-वजिराबाद येथील श्री शिवाजी प्राथमिक शाळेमध्ये ख्रिसमस (नाताळ) सण अत्यंत आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळा परिसर रंगीबेरंगी सजावटीने नटलेला असून विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पंढरीनाथ काळे सर होते. तर सांस्कृतिक विभाग प्रमुख शहाजी आहेर सर, वजिराबाद विभागाच्या इन्चार्ज गिरे मॅडम, तेलंग मॅडम, अविनाश नाईक सर तसेच विश्वासराव गुरुप्रसाद सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी विद्यार्थ्यांनी ख्रिसमस सणाचे महत्त्व सांगणारी भाषणे, गीतगायन, नृत्य व लघुनाट्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. सांताक्लॉजच्या वेशात विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमादरम्यान प्रेम, बंधुता, एकोपा व मानवतेचा संदेश देण्यात आला.मुख्याध्यापक पंढरीनाथ काळे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ख्रिसमस सणाचा सामाजिक व नैतिक संदेश स्पष्ट करताना, विविध धर्म व संस्कृतींच्या सणांमधून आपल्याला एकमेकांप्रती आदर, प्रेम आणि सहिष्णुता शिकायला मिळते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांतून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असेही त्यांनी आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
श्री शिवाजी प्राथमिक शाळेत ख्रिसमस सण उत्साहात साजरा
