सहजासहजी माणूस हल्ली भेटत नाही; गल्लोगल्ली सहज भेटतो आहे चमचा

सप्तरंगी साहित्य मंडळाच्या गझल मुशायऱ्यास प्रतिसाद

नांदेड- आजकाल सर्वच क्षेत्रांत चमचेगिरी वाढली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची किंवा वरिष्ठांची खोटी स्तुती करून, त्यांची मर्जी राखत किंवा त्यांच्या हो-ला-हो मिळवत वावरणाऱ्या चमचा लोकांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तींवर अन्याय होत असतो आणि कामाच्या ठिकाणी किंवा समाजात चुकीची संस्कृती निर्माण होते असते. खुषमस्करी करणाऱ्याला पुरस्कार दिले जातात. खरे मागे पडत आहेत आणि चमचे पुढे जात आहेत अशा आशयाची सहजासहजी माणूस हल्ली भेटत नाही, गल्लोगल्ली सहज भेटतो आहे चमचा…  ही गझल सादर करीत गझल मुशायराचे अध्यक्ष सुप्रसिद्ध गझलकार आत्तम गेंदे यांनी रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात रंगलेल्या गझल मुशायऱ्याचा समारोप केला.

         येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील हाॅटेल विसावा पॅलेस येथे साहित्य क्षेत्रातील पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या सन्मानार्थ कथाकथन, काव्यपौर्णिमा-१०२ आणि गझल मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. यात चंद्रकांत कदम ( सन्मित्र), सय्यद चाँद तरोडकर, डॉ. स्वाती भद्रे-आकुसकर, दीपाली कुलकर्णी, अंजली मुनेश्वर, विजय वाठोरे, विजय धोबे, कपिल सावळेश्वरकर, शंकर माने, सुनिता डरंगे यांनी सहभाग घेतला. हरेक मतला आणि शेरांवर टाळ्यांचा गजर झाला. समाजातील कुप्रवृत्ती, दांभिकता, विडंबन, वितुष्ट यांना झोडपून काढीत एकमेकांत सौहार्द, जिव्हाळा, प्रेम, ऐक्य, सुसंवाद प्रस्थापित करणाऱ्या गझलांचे सादरीकरण करून वातावरण मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन सन्मित्र चंद्रकांत कदम यांनी केले तर आभार नागोराव डोंगरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!