नांदेड(प्रतिनिधी)-कॉंगे्रस कार्यकर्ते कॉंग्रेस या राजकीय पक्षासोबत खऱ्या अर्थाने इमानदार आहेत काय? याची तपासणी कॉंगे्रस पक्षाने अत्यंत उत्कृष्ट पध्दतीचे स्कॅनर लावून करावी असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर नांदेड येथे कार्यकर्ता मेळाव्यास संबोधन करण्यासाठी ऍड. प्रकाश आंबेडकर हे नांदेडमध्ये आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कॉंगे्रस पक्षासोबत युती होणार आहे की, नाही याचे उत्तर 30 डिसेंबर रोजी मिळेल असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत एमआयएम पक्षासोबत युती होण्याच्या प्रक्रियेला मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. कॉंगे्रस पक्षाने दिलेल्या जागांच्या अनुपातानुसार नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये जिल्ह्यात एकच उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा निवडूण आला. यावर स्मित हास्य करत ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जेवढ्या जागा दिल्या. त्यानुसार एका व्यक्तीची निवड बरोबर आहे. पण आशा नेहमी कायम असावी याच धर्तीवर पुन्हा एकदा कॉंगे्रस पक्षासोबत युती करण्याची तयारी सुरू आहे. या प्रसंगी ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कॉंगे्रस या राजकीय पक्षाने याची तपासणी अगोदर करावी की, त्यांचे कार्यकर्ते पक्षाचे आदेश ऐकतात की, इतर कोण्या पक्षाच्या व्यक्तीचे आदेश ऐकतात.
सध्या देशात भारतीय जनता पक्ष इतर राजकीय पक्षांना समाप्त करण्याच्या तयारीने काम करत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रीपणे या भारतीय जनता पार्टीच्या उद्देशाला तोडणे आवश्यक आहे. नाही तर भविष्यात फक्त एक राजकीय पक्ष अशी हुकूमशाही राजसत्ता भारतात तयार होणार आहे. यासाठी जनतेने जे सत्ताधीश आहेत. त्यांना मतदान न देता विरोधी पक्षांना मतदान करावे तरच निवडणुकीचा मुळ गाभा शिल्लक राहिल. नसता लोकशाही समाप्तीकडेच जाणार आहे.
आजच्या परिस्थितीत लाडकी बहिण या योजनेसाठी शासनाला दरवर्षी 50 हजार कोटी रुपयांचा खर्च होत आहे. त्यासाठी इतर योजनांचा पैसा त्या योजनेला पुर्ण करण्यासाठी वळविला जात आहे. सोबतच ज्या समृध्दी महामार्गातून महसुल उत्पन्न वाढेल अशी इच्छा ठेवून हे मार्ग मिळवले. तेथून तेवढाा महसुल उत्पन्न होत नाही. म्हणून सामान्य माणसांच्या योजनांमधील सामान्य माणसाचा निधी लाडकी बहिण योजना आणि समृध्दी महामार्गांसाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज देण्यात खर्च होत आहे. मुंबई महानगरपालिकेने आपल्या उत्पन्नातील 2 लाख कोटी रुपयांचे फिक्स डिपॉझिट अशी गुंवणूक केली होती. त्यातील 50 हजार कोटी रुपये शासनाने काढून घेतले आहे. पण तो 50 हजार कोटींचा निधी विकासासाठी खर्च झाला नाही तर समृध्दी महामार्गासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज देण्यासाठी झाला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य भिकारी होण्याच्या परिस्थितीकडे जात आहे. अशा परिस्थितीत जनतेने सत्ताधाऱ्यांना मतदान करून नये असे आवाहन ऍड. प्रकाश आंबेडकरांनी केले.
भारतीय जनता पार्टी कशा पध्दतीने निवडणुक जिंकते याचे गणित मला माहित आहे. आता पुढे येणाऱ्या पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या विरोधी पक्षांचे राज्य असलेल्या सत्ताधाऱ्यांनी माझ्यासोबत संपर्क केला तर मी त्यांना ती आयडीया देवू शकतो. जेणे करून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला तेथे निवडणुक जिंकता येणार नाही. परंतू त्याची सुरूवात आतापासूनच करायला हवी. हे बोलत असतांना ऍड .प्रकाश आंबेडकरांनी भारतीय जनता पार्टीला निवडणूक जिंकून देणारा माणुस हा आतील व्यक्तील आहे असे सुचक विधान केले.
जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज बांग्लादेशांमध्यील अल्पसंख्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द गदारोळ उठवितो आहे त्या आरएसएसने आपल्या स्वत:ची पात्रता तपासावी. याच आरएसएसला 90 टक्के हिंदु लोकवस्ती असलेल्या नेपाळ देशात भुकंप झाला असतांना आरएसएस मदतीला गेली होती. तेंव्हा त्यांना मारून हाकलून दिले होते. बांग्लादेशामध्ये सध्या सुरू असलेल्या गदारोळाबाबत ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले ज्या बांग्लादेशाला बनविलेच भारताने, सोबतच तेथील शरणार्थ्यांना भारतात शरण दिली आता त्यांना तुम्ही घुसखोर म्हणत आहात म्हणजे आपले काय चुकले हे स्वत: तपास करण्याची गरज आहे. या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे ऍड. अविनाश भोसीकर, शिवा नरंगले, शाम कांबळे, इंजि.प्रशांत इंगोले, एकनाथ बाम्हणवाडेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
