नांदेड- उत्तम अभिनय, आवाजातील आरोह अवरोह, आणि कथा पात्रांच्या लकबीसह भेदक नजरेने कथेचा आशय विनोदी शैलीने रसिकांच्या मनमष्तिकात भरुन ठेवणाऱ्या ‘असे घडले रामायण’ या कथेने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः शेवटपर्यंत खिळवून ठेवले. येथील कथाकार बालाजी थोटवे यांनी सप्तरंगी सत्कार समारंभात कथाकथन या सत्रात उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, अनुरत्न वाघमारे, माधव जाधव, डॉ. ज्ञानेश्वर हांडरगुळीकर, एन. सी. भंडारे, देविदास वाघमारे, नागोराव डोंगरे, रणजित गोणारकर आदींची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने कवी, कवयित्री यांना विविध संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल सप्तरंगी सत्कार समारंभाचे आयोजन शहरातील हाॅटेल विसावा पॅलेस येथे करण्यात आले होते. त्याप्रित्यर्थ कथाकथन गझल मुशायरा आणि काव्यपौर्णिमा-१०२ या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या सत्रात कथाकार बालाजी थोटवे यांनी कथाकथन केले. कथेतील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका आणि सेवक यांनी सादर करावयाच्या रामायणावर आधारित नाटक यांवरील गमतीजमतीच्या घटनांची असे घडले रामायण ही कथा अत्यंत खुमासदार शैलीत सादर केली. कथा संपेपर्यंत कुणीही चुळबुळ केली नाही. सभागृहात रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.
