नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तळमजला येथे 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वा. राष्ट्रीय लोकअदालतीचा उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, बार असोसिएशन अॅड आशिष गोधमगावकर, जिल्हा सरकारी वकील अॅड रणजित देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे तसेच नांदेड येथील सर्व न्यायाधीश उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सुनील वेदपाठक यांच्या हस्ते उत्कृष्ट बाल-साहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा सत्कार करतांना त्यांच्या साहित्यिक कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे यांनी तयार केलेली लोकअदालतीविषयीची चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड गजानन पिंपरखेडे यांनी केले.
या लोक न्यायालयात नांदेड जिल्हयातील एकूण 13 हजार 723 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी 911 प्रकरणे निकाली निघाली व जवळपास दहा कोटी 43 लाख रूपयाचे तडजोड मुल्य मिळाले मालमत्ता थकबाकीची, पाणीपट्टीची एकूण 29 हजार 541 प्रकरणे ठेवली होती त्यापैकी 2 हजार 701 प्रकरणे निकाली निघाली व 4 कोटी 65 लाख रूपयांचे तडजोड मुल्य आहे, असे एकूण 3 हजार 612 प्रकरणे निकाली निघाली आणि तडजोड मूल्य 14 कोटी 49 लाख 63 हजार 436 रूपये एवढे आहे, लोक न्यायालयासाठी सहभागी झालेल्या सर्व पक्षकार बांधव, न्यायाधीश वर्ग, कर्मचारी वर्ग त्या सर्वांचे आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे यांनी मानले.
