उस्माननगर (प्रतिनिधी)– चिंचोली शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळूउपसा प्रकरणात उस्माननगर पोलिसांनी महसूल पथकासोबत संयुक्त कारवाई करत तब्बल 23 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांवर चोरीसह खाणखनीज अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना अशी—
दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी सुमारास पोलिस आमदार गंगाधर साहेबराव चिंचोरे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकात उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव निलपत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर, पोलीस आमदार गंगाधर चिंचोरे, विश्वनाथ बोरकर, माधव पवार, तुकाराम जुने, मिर्झा बेग, बंदुके, प्रदीप राठोड तसेच मंडळ अधिकारी शिवकांता पवार आणि ग्राम महसूल अधिकारी मोतीराम पवार आदींचा समावेश होता.

पथकाने चिंचोली शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा टाकला असता तेथे सहा लोखंडी इंजिनद्वारे अवैध वाळूउपसा होत असल्याचे आढळून आले. काढलेली वाळू थर्माकोलच्या तरफ्यांच्या मदतीने नदीकाठी आणली जात होती.
जप्तीमध्ये—
- 17 लाख 50 हजार किमतीची सहा लोखंडी छोटे इंजिन
- 6 लाख किमतीच्या 12 थर्माकोलच्या तरफ्या
एकूण मुद्देमाल 23 लाख 50 हजार रुपये
यातील काही साहित्य नदीकिनारीच नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दाखल गुन्हा
या प्रकरणी गुन्हा क्रमांक 285/2025 नुसार पोलिसांनी खालील पाच जणांवर गुन्हा नोंदविला आहे—
- परमेश्वर अंगदराव शिंदे, रा. डोळारा, ता. लोहा
- हनुमंत तुकाराम जाधव, रा. चिंचोली, ता. लोहा
- आकाश माधवराव जाधव, रा. चिंचोली, ता. लोहा
- गोपीनाथ पांडुरंग जाधव, रा. चिंचोली, ता. लोहा
- सतीश लक्ष्मण येडे पाटील, रा. मारतळा, ता. लोहा
पोलिसांनी ठोस कारवाई करत अवैध वाळूउपशावर मोठा आघात केल्याने परिसरात चर्चा रंगल्या आहेत.
