पंढरपूर–उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी ठरलेले पोटा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बळीराजाला सुखी समाधानी ठेवण्याचे साकडे यावेळी पांडुरंगाला घातले.
श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी, बैठक व्यवस्था यासह सर्व प्रकारच्या सुविधा मिळण्यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्याकरीता राज्य शासनाने १३० कोटीचा निधी मंजूर केला असून या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत, प्रशासनाने हे काम अत्यंत जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद केलेले असून वारकऱ्यांना लवकर दर्शन मिळत आहे, कारण वारकरी हाच व्हीआयपी आहे. राज्यातील शेतकऱ्यावर मोठे संकट आले असून शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अशा संकट काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बळीराजावर आलेले अरिष्ट दूर कर, त्यांना सुख व समाधानाचे दिवस येऊ दे, असे साकडे त्यांनी पांडुरंगास घातले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व एमटीडीसी यांच्यातील जागेबाबतच करारनामा ३० वर्षापर्यंत करण्यास उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. सर्व्हे नंबर १६१ मधील जागेबाबतचा प्रस्ताव पुढील महिन्यात पाठविण्याच्या सूचना दिल्या.
चंद्रभागेसह सर्व नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. यावर्षीच्या कार्तिकी वारीमध्ये भाविकांना अधिक चांगल्या सुविधांसाठी अतिरिक्त पाच कोटींचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सर्व भाविकांना कार्तिकी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच मानाच्या वारकऱ्यांचे अभिनंदन केले. मानाच्या वारकऱ्यांना एसटीचा मोफत पास एक वर्षा ऐवजी कायमस्वरूपी देण्याची घोषणादेखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. दरम्यान यावर्षीपासून प्रथमच शालेय विद्यार्थ्यांची मानाचे विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली. विद्यार्थी मानसी आनंद माळी व आर्य समाधान थोरात यांना हा मान मिळाला.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, अभिजीत पाटील, तानाजी सावंत, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व समिती सदस्य तसेच समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व मान्यवर उपस्थित होते.
