नांदेड – भारताचे माजी राष्ट्रपती आणि सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुलात विविध वाङ्मयीन कलाकृतींच्या वाचनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात विद्यापीठातील लेखक, कवी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी साहित्यवाचनाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण यांनी केले. गेल्या काही वर्षांत स्मार्ट फोनचा वाढता वापर आणि घटती वाचनाची वेळ यामुळे सामाजिक आणि वैचारिक स्वास्थ्य धोक्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. “आपण किती वाचतो यापेक्षा आपण काय वाचतो हे अधिक महत्त्वाचे आहे. विवेकशील व सुदृढ समाजनिर्मितीसाठी सकारात्मक व निकोप वाचन गरजेचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रा. रमेश ढगे, प्रा. शैलजा वाडीकर, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. नीना गोगटे, डॉ. राजेंद्र गोणारकर, विधी मुंदडा, रविंद्रसिंग तातू आणि श्रीकांत वाघमारे, श्वेता बासरवाड, विधी मुंदडा यांनी या प्रसंगी विविध साने गुरुजी, नारायण सुर्वे, कलाकृतींचे वाचन केले. या कार्यक्रमात सहभागी सर्वांनी स्मार्टफोन बंद ठेवून अखंड वाचनाचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी मो. झिशान अली यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
