नांदेड(प्रतिनिधी)-देशाच्या न्याय व्यवस्थेवरच हल्ला झाल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा वकील संघाने या घटनेचा तिव्र निषेध करत मंगळवारी त्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. यावेळी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर वकील संघाच्या वतीने निदर्शनेही करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने वकील राकेश किशोर तिवारी याने बूट फेकण्याचा प्रयत्न केला; मात्र वेळीच त्याला सुरक्षारक्षकाने पकडून बाहेर काढले. या घटनेमुळे न्यायसंस्थेचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला आहे. नांदेड जिल्हा वकील संघाने या घटनेचा निषेध केला आहे. भारतीय न्यायसंस्थेचा सन्मान आणि स्वायत्तता हा लोकशाहीच्या मूलभूत आधार स्तंभापैकी एक आहे. सर्वोच्च न्यायालयासारख्या पवित्र संस्थेत अशा प्रकारचे असभ्य आणि अमानवीय कृत्य कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरता येणार नाही. न्यायव्यवस्थेवर अशाप्रकारे अपमानास्पद वर्तन करणार्या व्यक्तीच्या वृत्तीचा जिल्हा वकील संघाने प्रखर निषेध केला आहे. अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जिल्हा वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
या निषेधार्थ 7 ऑक्टोबर रोजी जिल्हा वकील संघाच्या सर्व सदस्यांनी या घटनेचा निषेध करून न्यायालयीन कामकाज बंद ठेवले. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घटनेचा निषेधाचा ठरावही पारित करण्यात आला. यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. आशिष गोधमगावकर, उपाध्यक्ष ऍड. संजय वाकोडे पाटील, सचिव ऍड. अमोल वाघ, कोषाध्यक्ष ऍड. मारुती बागलगावकर, महासचिव ऍड. रशीद पटेल, विशिष्ट सहाय्यक ऍड. जयपाल ढवळे, ऍड. यशोनिल मोगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा न्यायलायात निदर्शने
