नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कोठारी ता.किनवट येथे एक घरफोडून चोरट्यांनी 65 हजारांचा ऐवज लांबवला आहे. तसेच शहरातील चैतन्यनगर भागातील एक घरफोडून चोरट्यांनी 58 हजार 400 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. निवळी शेत शिवार ता.मुखेड येथील 60 हजार रुपये किंमतीचा एक बैल चोरीला गेला आहे.
सिध्दार्थ निवृत्ती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान मौजे कोठारी ता.किनवट येथील त्यांच्या घराचे कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवले 15 हजार रुपये रोख रक्कम आणि 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र असा 65 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 285/2025 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कल्हाळे हे करीत आहेत.
चैतन्यनगर भागात राहणारे शेख असरार अब्दुल सत्तार यांच्या तक्रारीनुसार 27 सप्टेंबरच्या सकाळी 10 ते 28 सप्टेंबरच्या सकाळी 10 वाजेदरम्यान त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 49 हजार रुपये रोख रक्कम आणि 9 हजार 200 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे असा 58 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 395/2025 नुसार दाखल केली असून पोलीस अंमलदार कांबळे अधिक तपास करीत आहेत.
अच्छुतराव गोविंदराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या निवळी येथील शेत शिवारात बांधलेला 60 हजार रुपये किंमतीचा बैल 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते रात्री 9.30 वाजेदरम्यान कोणी तरी चोरून नेला आहे. मुक्रामाबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 161/2025 नुसार दाखल केली असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सिध्देश्र्वर अधिक तपास करीत आहेत.
कोठारीत घरफोडले, चैतन्यनगरमध्ये घरफोडले, निवळी शिवारातून बैल चोरी
