नांदेड(प्रतिनिधी)-सन 2022 मध्ये किनवट येथे घडलेल्या एक खून प्रकरणातील पाच आरोपींपैकी दोघांची सुटका करून तिन जणांना दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ.स्वप्नील तावशीकर यांनी सदोष मनुष्यवधासाठी दोषी जाहीर केले आहे. या तिघांची शिक्षा मात्र 30 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.
दि.12 डिसेंबर 2022 रोजी किनवट शहरातील भोईगल्लीमध्ये श्रीकांत भुमन्ना कंचरलावार यांच्यावर हल्ला झाला. हा प्रकार सकाळी 10 वाजता घडला होता. त्यांना त्यांच्या काही मित्रांनी दवाखान्यात आणले. या संदर्भाने किनवट पोलीसांनी गुन्हा क्रमांक 240/2022 जीवघेणा हल्ला या सदरात दाखल केला. पुढे उपचारादरम्यान श्रीकांत भुमन्ना कंचरलावार यांचा 27 डिसेंबर 2022 रोजी मृत्यू झाला. त्यामुळे या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम 302 वाढले. या प्रकरणात जमीनीच्या वादातून किशोर शिवराम कोल्हे (44), संतोष शिवराम कोल्हे (47), अशोक शिवराम कोल्हे (55), विकास उर्फ विक्की अशोक कोल्हे (34) आणि विशाल अशोक कोल्हे (32) यांची नावे आरोपी सदरात होती.
या प्रकरणात अगोदर पोलीस निरिक्षक दिपक बोरसे आणि पुढे पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांनी तपास केला. पाचही आरोपींना अटक करण्यात आली आणि नांदेड जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. नांदेड जिल्हा न्यायालयात हा सत्र खटला क्रमांक 53/2023 सुरू झाला. या पाच आरोपींपैकी तिन जणांना न्यायालयाने जामीन दिला होता. दोन आज दोषी जाहीर करेपर्यंत सुध्दा तुरूंगातच होते. न्यायालयात या प्रकरणी 19 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. युक्तीवादात सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाच्यावतीने वरिष्ठ न्यायालयांचे अनेक निवाडे सादर करण्यात आले. आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ.स्वप्नील तावशीकर यांनी या पाच आरोपींपैकी किशोर शिवराम कोल्हे आणि अशोक शिववराम कोल्हे या दोघांची सुटका केली. पण संतोष शिवराम कोल्हे (47), विकास उर्फ विक्की अशोक कोल्हे (34) आणि विशाल अशोक कोल्हे (32) या तिघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 304 भाग 2 प्रमाणे सदोष मनुष्यवधासाठी दोषी जाहीर केले. सदोष मनुष्यवध म्हणजे त्यांच्या खून करण्याची इच्छा नव्हती. पण झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्याला सदोष मनुष्यवध असे म्हणतात.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड. मोहम्मद आब्बास यांनी शिक्षेसाठीचा युक्तीवाद करतांना अजन्म कारावास द्यावा अशी मागणी केली. सोबतच मरण पावलेल्या श्रीकांत भुमन्ना कंचरलावार यांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. या प्रकरणात किनवटचे पोलीस अंमलदार विजय वाघमारे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पुर्ण केली. न्यायालयाच्या कामकाजाप्रमाणे न्यायालयाने या तिन आरोपींना त्यांच्या गुन्ह्यासाठी दोषी जाहीर केले आहे. परंतू त्यांच्या शिक्षेचे स्वरुप काय असेल याची निश्चिती दि.30 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.
किनवट येथील श्रीकांत कंचरलावार यांच्या खूनासाठी तिन आरोपी दोषी जाहीर; शिक्षा 30 सप्टेंबर रोजी
