ट्रकच्या धडकेत दोघींचाही मृत्यू, पुण्याच्या भोसरीतील घटना
नांदेड(प्रतिनिधी)–श्री गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या मामी व भाचीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे दि.6 रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. दोघींवरही नांदेड तालुक्यातील बळीरामपूर येथे दि.7 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
बळीरामपूर येथील कृष्णा आंबटवार हा भोसरी येथे खासगी कंपनीत नौकरीला असून तो आपल्या पत्नीसह भोसरी येथे राहत होता. दि.6 रोजी श्री गणेश विसर्जन पाहण्यासाठी कृष्णाची पत्नी प्रतिभा आंबटवार व त्याची भाची कादंबरी गादेकर व ईतर नातेवाईक गेले होते. दरम्यान विसर्जन मार्गावर एका वळण रस्त्याच्या ठिकाणी अचानक एक ट्रक दुसर्या ट्रकवर धडकला या अपघातात दोघींनाही जबर दुखापत झाली. उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान दि.7 रोजी प्रतिभा आणि कादंबरी हिच्या पार्थिवदेहावर बळीरामपूर येथील स्मशानभूमीत सायंकाळी 7 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
