जबरी चोरीप्रकरणी आरोपीस ५ वर्ष ९ महिने कैद आणि ४५ हजार रोख दंड

बिलोली (प्रतिनिधी) – सन २०१९ मध्ये एका नागरिकाच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम चोरल्याप्रकरणी बिलोली येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. आय. घोरपडे यांनी आरोपी किरण शिवाजी (वय ३५) यास पाच वर्ष नऊ महिने सक्तमजुरी आणि ४५ हजार रुपयांचा रोख दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै २०१९ रोजी मध्यरात्री, बिलोली शहरातील भास्कर नगर येथे राहणारे शेख सुलेमान शेख अहमदनगर यांच्या घरी आरोपी किरण शिवाजी याने घरात घुसून चाकूचा धाक दाखवला. त्याने पीडिताच्या खिशातील २,००० रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच, याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

 

या प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२१/२०१९ नोंदवण्यात आला होता. गुन्ह्यांत भारतीय दंड संहितेच्या जबरी चोरीसह विविध कलमांचा समावेश करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास त्या वेळी बिलोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास केंद्रे यांनी केला. त्यांनी संपूर्ण चौकशी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तपासादरम्यान सादर करण्यात आलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले.त्यानुसार, न्यायाधीश व्ही. आय. घोरपडे यांनी आरोपी किरण शिवाजी याला पाच वर्ष नऊ महिने कैद आणि ४५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कैदेची तरतूद ठेवण्यात आली आहे.

 

या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. एम. के. मांडे यांनी युक्तिवाद केला. बिलोली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ए. एस. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अंमलदार माधव पाटील यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!