नांदेड (प्रतिनिधी) – कृषी विभागाच्या भरारी पथकाने नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई करत विनापरवाना आणि अनधिकृतपणे कीटकनाशकांची विक्री व पुरवठा करणाऱ्या ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत एकूण १९ लाख ०३ हजार रुपयांचा कीटकनाशक साठा जप्त करण्यात आला आहे.
ही धाड जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, विभागीय कृषी संचालक अशोक किरनळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आणि बालाजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आली. कारवाई पथकात नीलकुमार एतवडे, सचिन कपाळे, अमोल पेकम यांच्यासह गुणनियंत्रण विभागाच्या पूनम चातरमल यांचा समावेश होता.
गिरनार कार्गो एस्कॉर्ट (वाजेगाव) येथे ही धाड टाकण्यात आली. त्या ठिकाणी गुजरातमधील राजकोट येथील ‘एव्हलॉन क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि औरंगाबादच्या ‘श्रीनय बायोटेक’ या दोन कंपन्यांची कीटकनाशके आढळून आली. याप्रकरणी कैलास रामचंद्र मुगडे, मारुती भिमराव मुनके आणि राजेंद्र अशोकराव भुरे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघे नायगाव व बिलोली तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते.
पूनम चातरमल यांच्या तक्रारीनंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम 344/ 2025 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गढवे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
सध्या शेतीच्या कामांचा जोर असतो आणि अशा काळात अनेक बनावट उत्पादक आणि वितरक याचा गैरफायदा घेतात. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने केलेली ही कारवाई उल्लेखनीय ठरली आहे. यामुळे जिल्ह्यात अशा प्रकारच्या अनधिकृत विक्रीला आळा बसण्याची अपेक्षा आहे.
