नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील जैविक खतांच्या सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांना थेट किरकोळ विक्री न करता, स्वतःच्या दुकानातच साठा दाखवून नंतर रॅक पॉइंटवरून काळाबाजार केला जात असल्याची गंभीर तक्रार सामाजिक कार्यकर्ते धनराज बद्रीनारायण मंत्री यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मंत्री यांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांना योग्य दरात जैविक खत मिळावे, यासाठी जिल्ह्यात जैविक खत वितरणाच्या सोसायट्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्था उपनिबंधक कार्यालयाच्या परवानगीने कार्यरत असून, त्यांना केवळ शेतकऱ्यांनाच खत विक्री करण्याचे बंधन आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना थेट किरकोळ विक्री न करता, गेल्या २४-२५ वर्षांपासून या संस्थांनी एकाच दुकानातूनच साठा दाखवून टंचाई कृत्रिमरित्या निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नंतर हे खत रॅक पॉइंटवरून इतर व्यापाऱ्यांना जास्त दराने विकले जात असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
धनराज मंत्री यांनी असेही निदर्शनास आणले की, काही सोसायट्यांकडे किरकोळ परवाने असूनही खतांची थेट विक्री केली जात नाही. इतकेच नव्हे तर, काही दुकाने इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असूनही त्यांना परवाने देण्यात आले आहेत. एवढा मोठा खत साठा पहिल्या मजल्यावर कसा जातो, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.इफको कंपनीच्या पत्रानुसार केवळ किरकोळ खत विक्री करण्याचीच परवानगी असतानाही काही ठिकाणी होलसेल विक्री होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, या संस्थांनी आजपर्यंत खतांचे किती सॅम्पल दिले, याबाबत कृषी विभागाकडून लेखी खुलासा मागण्यात आला आहे.
८ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांनी उपोषणाची सूचना दिल्यानंतर, कृषी विभागाने १२ ऑगस्ट रोजी लेखी उत्तर देऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.धनराज मंत्री यांनी निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, १३ ऑगस्ट २०२५ पासून ते जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. त्यांच्या जीवाला काही हानी झाल्यास त्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक नांदेड, कृषी अधिकारी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), तसेच वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.
