नांदेड(प्रतिनिधी)-मौजे बाचोटी ता.कंधार येथे अवैध रित्या विक्री होत असलेली दारु बंद करण्यासाठीचे निवेदन 107 महिला आणि 73 पुरूषांच्या स्वाक्षऱ्यांसह बाचोटीच्या गावकऱ्यांनी पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे कंधार यांच्याकडे दिले आहे.
या निवेदनात नमुद आहे की, मौजे बाचोटी ता.कंधार येथे अनेक वर्षापासून अनाधिकृत दारु विक्री होत आहे. गावातील पानपट्टी, काही किराणा दुकान यामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात दारु विक्री सुरू आहे. या गावात जिल्हा परिषदेच्या वतीने पहिली ते दहावीपर्यंतची शाळा आहे. शाळेसमोर दारु विक्री करण्यास बंदी असतांना सुध्दा गावातील बस स्टॅंड, पानपट्या, काही किराणा दुकान आणि काही अनाधिकृत अड्डे उघडपणे दारु विक्री करत आहेत. या दारुच्या व्यसनाने गावातील तरुण व्यसनाधिन होत आहे, कित्येक गोर गरीबांचे संसार उध्वस्त झाले आणि होत आहेत. ग्राम पंचायतमध्ये तोंडी तक्रार करून सुध्दा त्यावर आजतागायत ग्रामपंचायतने कोणतीही कार्यवाही केली नाही. दारु विक्रेत्यांना सांगितले तर ते आरेरावीची भाषा बोलून भांडण करत आहेत. ते आम्हाला सांगत आहेत की, तुम्ही कोठेही जा आमचे काही वाकडे होते नाही. तरी पोलीस निरिक्षक कंधार साहेबांनी अवैध आणि अनाधिकृत दारु विक्री बंद करून कायदेशीर कार्यवाही करावी. या अर्जावर 107 महिला आणि 73 पुरूषांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अर्जाची प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सुध्दा पाठविण्यात आली आहे.
बाचोटी ता.कंधार येथे अनाधिकृत दारु विक्री अड्डे बंद करण्यासाठी गावकऱ्यांचे निवेदन
