जवाब नकोत का सरकारला? राहुल-प्रियंका,अखिलेश यादव-असदुद्दीन ओवेसी बोलतात, माध्यमं गप्प!

“ऑपरेशन सिंदूर” संदर्भात लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा संपन्न झाली. या चर्चेत खा. असदुद्दीन ओवेसी, खा.अखिलेश यादव, खा. प्रियंका गांधी, आणि विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी दिलेली भाषणे अत्यंत मर्मस्पर्शी होती. मात्र, पामेरियन मीडियाने या भाषणांना कुठलेही महत्त्व दिले नाही. यावरून असे स्पष्ट होते की, लोकशाहीत जनतेच्या आवाजाला आजही फारसे स्थान नाही.

या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित होतो ,ही हुकूमशाही केव्हा थांबणार? आम्ही हे हिटलरशाही सरकार अजून किती काळ सहन करणार? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ तास ४६ मिनिटांचे भाषण केले, परंतु त्यांनी पहलगाममधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांविषयी एकही ओळ बोलली नाही. त्यांनी भारताचे जेट विमान किती पडले, काय नुकसान झाले, याचा उल्लेख केला नाही. अमेरिकेने युद्धविराम का जाहीर केला, तेही सांगितले नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प खोटे बोलत आहेत, हे त्यांनी का सांगितले नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले.खरेतर खासदार असदुद्दीन ओवेसी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांची भाषणे देशासाठी दिशादर्शक ठरली. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांना शिव्यांचा वर्षाव करणाऱ्यांकडे शहिदांच्या कुटुंबीयांसाठी वेळ नाही, ही वस्तुस्थिती आहे. हाच प्रश्न पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या शुभमची पत्नी एशान्या यांनी विचारला. त्यांनी उलट राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे आभार मानले, कारण कोणत्याही सत्ताधारी सदस्याने शुभमचा किंवा विनय नरवालचा उल्लेख केला नव्हता.

विनय नरवाल यांच्या पत्नीनेही म्हटले की, या घटनेला हिंदू-मुस्लिम नजरेतून पाहू नका. २६ लोकांना ठार मारण्यात आले,ज्यांनी हे कृत्य केले त्यांना नक्कीच कंठस्नान घालण्यात यावे , पण आरोप मात्र काश्मीरवरच केला गेला. ईशान्य यांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांचे आभार यासाठी मानले की, त्यांनी लोकसभेत भाषण करताना मृतांचे स्मरण केले. प्रियंका गांधींनी तर एकेक शहीदाचे नाव घेऊन त्यांच्या बलिदानाचा उल्लेख केला आणि ‘हे सर्व भारतीय होते’ असे ठामपणे सांगितले.त्या वेळी काही सदस्य ‘हिंदू मेले’ असे म्हणत होते, पण काँग्रेसच्या वतीने ‘भारतीय’ असा उल्लेख झाला. त्याच वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस सदस्यांना ओरडू नका, अशी कडक सूचना दिली. पण जेव्हा ‘मोदी मोदी’चे नारे लावले जातात, तेव्हा मात्र ते गप्प राहतात. हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

एशान्या सांगत होत्या की, पंतप्रधान मोदी यांनी २६ मृतांविषयी काहीच बोलले नाही, याचे त्यांना दुःख वाटते. शुभमच्या मृत्यूनंतर झालेल्या गोळीबारात लोक जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाले. कुणी मुलांना ओढत नेत होता, कुणी एकमेकांना मदत करत होता. प्रियंका गांधींनी या सगळ्या वेदनांचा शब्दांतून उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले की, ‘मी विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटलो. त्यांचे दुःख मी पाहिले. पण आज ज्या लोकांना नेहरूंना शिव्या द्यायच्या आहेत, त्यांना हे दुःख दिसणारच नाही. जे काँग्रेसला पाकिस्तानशी जोडतात, त्यांना विनय नरवाल यांचे दुःख कधीच समजणार नाही.’प्रियंका गांधींनी मृतांचे नाव घेतल्यावर ‘जय हिंद’ म्हणत भाषण संपवले. भाजप म्हणते की, युद्ध होत असताना चर्चा होऊ नये, पण आज भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानसोबत आशिया कपमध्ये खेळणार आहे. यावर ईशान्य यांनी आक्षेप घेतला आणि या सामन्याचा बहिष्कार जाहीर केला. त्या म्हणाल्या की, ‘आम्ही भारतीय आहोत, पण सरकारसाठी आम्ही महत्त्वाचे नाही.’

 

प्रियंका गांधी कठीण रस्ता निवडून भाषण करत होत्या कारण त्यांना माहीत होते की, ‘हिंदू-मुस्लिम’ केले की मतांचा गठ्ठा वाढतो. पण त्या केवळ भारतीय नागरिक मेले म्हणून दुःख व्यक्त करत होत्या, आणि त्यात कोणतीही भीती त्यांच्या बोलण्यात नव्हती. अत्यंत नाराज असूनही शुभमच्या पत्नीने पंतप्रधान मोदींना धन्यवाद दिले, हे त्यांचे मोठेपण आहे.शहिदांची नावे पंतप्रधान किंवा सत्ताधारी पक्षातील कोणत्याही मंत्र्यांनी घेतली नाहीत, हे खेदजनक आहे. प्रियंका गांधी भारताच्या पंतप्रधान नाहीत, पण त्यांना जबाबदारी वाटते, म्हणून त्या नावे घेतात. कारण सत्ताधाऱ्यांमध्ये ती जबाबदारीच नाही.

प्रियंका गांधी ‘भारतीय’ म्हणाल्या तेव्हा भाजप सदस्य ‘हिंदू’ म्हणत होते आणि हेच तर पाकिस्तानला हवे होते. मग खरे पाकिस्तानी कोण? काँग्रेस की भाजप? पाकिस्तानने धर्म पाहून लोक मारले, पण आपल्याकडे धर्माच्या नावावर विष पसरवले जाते, हेच त्यांचा उद्देश होता.प्रियंका गांधी म्हणाल्या की, राजनाथ सिंह सांगतात की, आपले इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षित आहे. पण मग जहाजे आणि विमाने कोसळली त्याचे काय? कोणी जबाबदारी घेतली? गृहखात्याने घेतली का?

 

‘टीआरएफ’ या संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.2020 ते 2025 पर्यंत टीआरएफने 41 सेनेचे अधिकारी कर्मचारी यांची हत्या केली सत्तावीस ची हत्या केली आणि 54 लोकांना जखमी गेले भारत सरकारने टी आर एफ ला आतंकवादी संघटनेचा दर्जा सन 2023 मध्ये दिला अमेरिकेने तिला अतिरेकी संघटना घोषित केले आहे. परंतु विदेशमंत्री जयशंकर यांना हे सांगताना प्रियंका गांधींनी अडचणीत टाकले. सरकार आपल्या अपयश लपवण्यासाठी नेहरूंच्या काळातील गोष्टी सांगते. पण गेल्या अकरा वर्षात पुलवामा, पठाणकोट, उरी, आणि आता पहलगाम हल्ला झाला याबद्दल ते काही बोलत नाहीत.२००८ साली मुंबई हल्ल्यानंतर त्यावेळी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला होता. आज मात्र कोणीही जबाबदारी घेत नाही. ३७० कलम रद्द केल्यानंतर आतंकवाद संपेल असे सांगण्यात आले होते. मग आजही हल्ले का होत आहेत?

 

गृहमंत्री अमित शहा काश्मीर दौऱ्यावर जाऊन सुरक्षेचा आढावा घेत होते. मग पहलगामची सुरक्षा कमी का करण्यात आली? या सर्व प्रश्नांवर मीडियाने साधी नोंदही घेतलेली नाही.गृहमंत्री म्हणाले होते की, ‘आतंकवाद संपला आहे’, पण दोन आठवड्यांतच त्यांच्या विधानाला अतिरेक्यांनी खोटे ठरवले.विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक भाषणे दिली, पण ती मीडिया कव्हर करत नाही. फक्त सरकारच्या स्तुतीसाठीच माध्यमांचा वापर होतो, याचा पुरावा पुन्हा समोर आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!