धनखड यांना गप्प बसवलं गेलं का? सत्तेतील आवाजांमागचं मौन   

एक संवैधानिक तुटवडा; जेव्हा धनखड यांचा राजीनामा ही फक्त बातमी राहत नाही  

भारतीय लोकशाहीच्या इतिहासात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा हा लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून जी कारकीर्द निभावली, ती त्यांच्या पदाच्या मर्यादांना साजेशी नव्हती. त्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते, तेव्हाही त्यांनी संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊन ममता बॅनर्जी यांच्या सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता.त्यांनी जसे इतरांसोबत वागले, तसेच त्यांच्या वाट्याला आले. त्यांच्या राजीनाम्याच्या वेळी कोणताही औपचारिक निरोप समारंभ झाला नाही. पंतप्रधानांनी केवळ रात्री बारा वाजता ट्विट करून त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली. हेच तेच पंतप्रधान आहेत, जे गुलाम नबी आझाद यांच्या निरोपावेळी सभागृहात अश्रूंनी व्याकुळ झाले होते. तो अभिनय होता की त्यामागे काही दुसरेच राजकारण होते, हे प्रश्न आता धनखड यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

त्याच दिवशी दुपारी केंद्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले होते की, धनखड २३ जुलै या तारखेला राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत. पण रात्री नऊ वाजता, कोणतीही औपचारिकता न पाळता, त्यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन स्वतःहून राजीनामा दिला.कधी काळी जगदीप धनखड काँग्रेसमध्ये होते, पण नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे संविधानाच्या मर्यादा ओलांडल्या, त्यासाठी त्यांना पुरस्कार मिळायला हवा होता, पण प्रत्यक्षात त्यांची बेअब्रू झाली.त्यांनी राजीनामा देण्याऐवजी परिस्थितीला सामोरे जायला हवे होते. ते उभे राहिले असते, तर खरे स्वरूप उघड झाले असते.  जे गेली अकरा वर्षे झाकले गेले आहे. अनेक चर्चा आणि तर्क आता सुरू झाले आहेत. आमचे हे लिखाण कोणाच्या स्तुतिसाठी नाही, परंतु उपराष्ट्रपती या संवैधानिक पदाचा जो अवमान झाला, त्याने आमचे मन अस्वस्थ झाले, म्हणून हा शब्दप्रपंच.

‘द वायर’च्या  पत्रकार आरफा खानम यांनी सांगितले की, त्यांच्या संपूर्ण पत्रकारितेच्या कारकिर्दीत इतकी धक्कादायक राजकीय घटना त्यांनी कधीच पाहिली नव्हती. ही बातमी माध्यमांना कळलीसुद्धा नाही, ती थेट ट्विटरवरून बाहेर आली. उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्यामागे काही गंभीर राजकारण असल्याची चर्चा सुरू आहे.आजपर्यंत भारतात एखाद्या ग्रामपंचायतच्या सरपंचानेसुद्धा “माझी तब्येत ठीक नाही” म्हणून राजीनामा दिल्याचे ऐकिवात नाही. मात्र, उपराष्ट्रपतीने तब्येतीच्या कारणावरून राजीनामा दिला, ही बाब संशयास्पद वाटते. पंतप्रधानांच्या ट्विटमध्ये सांगण्यात आले की, धनखड यांनी राजकारणाच्या विविध टप्प्यांवर काम केले असून, त्यांच्या आरोग्याची काळजी वाटते आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

पत्रकार सबा नकवी यांचे म्हणणे आहे की, धनखड नाराज होऊन गेले किंवा त्यांना जबरदस्तीने बाजूला करण्यात आले. सध्याच्या पत्रकारितेत ‘बातमीमागील बातमी’ शोधण्याची परंपरा संपत चालली आहे. आज बहुतांश पत्रकार एकाच ठिकाणी बसून बातम्या लिहितात आणि तेच दाखवतात.धनखड यांनी विरोधकांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध आणलेल्या महाभियोग प्रस्तावाचा स्वीकार केला होता. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली का, असा प्रश्नही उपस्थित होतो. सभापती आणि उपराष्ट्रपती म्हणून धनखड यांचा स्वभाव गर्विष्ठ असल्याचा आरोपही केला जातो. ते स्वतःला सर्वाधिक हुशार आणि विद्वान समजत होते.विरोधकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला होता, मात्र आज तेच विरोधक त्यांच्याशी सहानुभूती दाखवत आहेत. भाजपकडे सध्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यात स्पष्टता नाही. त्यामुळे अंतर्गत वाद असावेत, हे ही शक्य आहे.धनखड यांचा राजीनामा भाजपमधील अंतर्गत संघर्ष, नेतृत्वाचा अभाव आणि RSS–भाजप यांच्यातील मतभेद यांचे लक्षण असू शकतो.

पत्रकार आशुतोष यांचे म्हणणे आहे की, धनखड यांचा ‘इगो’ दुखावला गेला होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोबत असे काही घडले, ज्यामुळे ते अस्वस्थ झाले. सरकारला त्यांचे कामकाज आवडत नव्हते. सरकारला वाटू लागले की, हा माणूस खूपच स्वतंत्र विचार करतो,जे सरकारला पटत नव्हते.त्याच दिवशी संध्याकाळी साडेचार वाजता BSE ची बैठक होती, पण त्यात किरण रिजिजू आणि जे.पी. नड्डा अनुपस्थित होते. याचा अर्थ असा की, सरकारचा त्यांच्यावर विश्वास नव्हता.

विरोधक त्यांच्या राजीनाम्याचा राजकीय फायदा घेत आहेत. कारण धनखड यांच्या पाठिशी उभे राहून ते सत्तेला एक प्रकारे इशारा देत आहेत. धनखड पंतप्रधानांसमोर सरळ उभेसुद्धा राहू शकत नव्हते, असे म्हटले जाते, मग सरकारने त्यांना का डावलले, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो.भाजप आणि RSS या दोघांमध्ये सध्या अंतर्गत ताण आहे. RSS ला वाटते की, पुढील २५ वर्षांसाठी हिंदू युनिटीसाठी दिशा ठरवावी लागेल. त्यांना मोदींच्या पुढील वारसदाराबाबत चिंता आहे.भाजपमध्ये अलीकडच्या काळात अनेक अपात्र नेत्यांना मुख्यमंत्री केल्याने आणि खऱ्या कार्यकर्त्यांना दूर केल्यामुळे संघात असंतोष आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या कमी जागा, मोदींची कमी झालेली लोकप्रियता, आणि RSS चे स्वप्न, या सगळ्याचा परिणाम धनखड यांच्या राजीनाम्यावर झाला असावा.पत्रकार सबा नकवी यांचे म्हणणे आहे की, धनखड यांची कथा भविष्यात वकिलांच्या माध्यमातून समोर येईल. कारण ते स्वतःही वकील होते.चांगल्या पत्रकाराचे हेच लक्षण असते.  जे समोर येत नाही, ते शोधून आणणे. कदाचित भविष्यात धनखड काही गोपनीय माहिती उघड करतील आणि त्यातून एक मोठा खुलासा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!