सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांना मृत्यू नंतर सन्मानपूर्वक अंतिम निरोप; डीजीपी रश्मी शुक्ला यांच्या आदेशाने एसओपी जारी
नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस दलात सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या मृत्यूनंतर सन्मानपूर्वक अंतिम निरोप देण्यासाठी एक नवी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) तयार करण्यात आली आहे. ही कार्यपद्धती २१ जुलै रोजी राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला यांच्या आदेशाने लागू करण्यात आली आहे.या एसओपी अंतर्गत, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कारासाठी पोलीस दलाच्या वतीने सन्मानपूर्वक उपस्थिती आणि शोक संदेश देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. संबंधित कुटुंबियांना भावनिक आधार देणे व विभागाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करणे, हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.
कोण पात्र?
नियमित सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती किंवा वैद्यकीय कारणास्तव निवृत्त झालेले आणि ज्यांच्याकडे वैध पेन्शनर ओळखपत्र आहे, अशा सर्व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना ही सुविधा लागू राहील.
अंतिम संस्कारासाठी आर्थिक आणि व्यवस्थापकीय मदत
- पोलीस कल्याण निधीतून अंतिम संस्कारासाठी दोन हजार रुपये पर्यंतचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
- संस्कारासाठी वाहन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित पोलीस घटक प्रमुखांची असेल.
- प्रतिनिधी अधिकारी संपूर्ण पोलीस गणवेशात उपस्थित राहणार असून त्यांनी संवेदनशील आणि सन्मानयुक्त वर्तन करणे अपेक्षित आहे.
प्रत्येक घटक प्रमुखांना सूचना
राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना ही एसओपी पाठवण्यात आली आहे. संबंधित घटकात कोणत्याही सेवानिवृत्त पोलिस अधिकारी किंवा अंमलदाराच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर त्वरित:
- मृत्यूची खात्री करावी.
- एक प्रतिनिधी अधिकारी नेमावा.
- कुटुंबीयांना अंतिम संस्कारात मदत करावी.
याशिवाय, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा तपशील, पासपोर्ट साईज छायाचित्र, अंतिम विधीची माहिती आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक नोंदवून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रमाणित प्रतिनिधी अधिकारी कोण असतील?
- पोलीस महासंचालक व अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी – पोलीस उपमहानिरीक्षक व त्यावरील अधिकारी.
- विशेष पोलीस महानिरीक्षक/पोलीस महानिरीक्षक साठी – पोलीस अधीक्षक वा त्यावरील अधिकारी.
- पोलीस अधीक्षक/अपर अधीक्षक साठी – पोलीस उप अधीक्षक वा त्यावरील अधिकारी.
- पोलीस निरीक्षक व त्याखालील पदांसाठी – पोलीस उपनिरीक्षक वा सहाय्यक पोलीस उप निरीक्षक.
औपचारिकता आणि अंतिम श्रद्धांजली
- पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी, गार्ड ऑफ ऑनर औपचारिक संचालनाशिवाय देण्यात यावा. बिगुलच्या ‘लास्ट पोस्ट’ निनादासह अंतिम श्रद्धांजली दिली जाणार आहे.
- संबंधित मृत अधिकाऱ्याचा शोक संदेश विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे.
- सर्व छायाचित्रे व नोंदी एक वर्षापर्यंत सुरक्षित ठेवाव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे.
संपर्क आणि अहवाल पाठवणे
- प्रत्येक घटक प्रमुखाने दरमहा मृत्यू संबंधी एकत्रित अहवाल पोलीस महासंचालक कार्यालयास सादर करावा.
- मुंबई व इतर महानगरांमध्ये वास्तव्यास असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी संबंधित नियंत्रण कक्ष अधिकारी जबाबदार असतील.
- संपर्क क्रमांक, इमेल, पत्ता इत्यादी माहिती दर सहा महिन्यांनी पडताळून अद्ययावत करणे आवश्यक आहे.
ही कार्यपद्धती केवळ औपचारिकता न ठेवता, पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांविषयी आदरभाव, जबाबदारी आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या या पावलाने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सन्मानाने निरोप देण्याची एक सुसंगत व्यवस्था निर्माण झाली आहे.
