धर्माबाद (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम या दोन गावांमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मशानभूमीसाठी योग्य जागा नसल्यामुळे मनूर गावातील नागरिकांनी संगम गावाच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संगम गावकऱ्यांनी त्यास तीव्र विरोध दर्शवल्याने वाद उफाळून आला. यामुळे गावकऱ्यांमध्ये झटापटीची परिस्थिती निर्माण झाली आणि दोन्ही गावात तणाव पसरला.
आज मनूर गावातील एका व्यक्तीचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मनूर गावातील नागरिक संगम गावातील गायरान जमिनीवर गेले असता, संगम गावकऱ्यांनी यास आक्षेप घेतला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलीस आणि महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठ्या बंदोबस्तात अंत्यविधी पार पाडण्यात आला.
स्मशानभूमीची जागा आहे, पण उपयोगात नाही
या संदर्भात महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संगम गावात स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. परंतु ती जागा मनूर गावासाठी वापरास द्यायला संगम गावकरी तयार नाहीत. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये कायमस्वरूपी स्मशानभूमीसंदर्भात वाद सुरू आहे.
या तणावाबाबत प्रतिक्रिया देताना धर्माबादच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी सांगितले की, “स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे. मात्र, ती एका गावाच्या हद्दीत असल्यामुळे दुसऱ्या गावातील नागरिकांनी तेथे अंत्यसंस्कार करणं त्या गावातील काही नागरिकांना मान्य नाही. त्यामुळे दोन्ही गावांच्या समन्वयातून लवकरच तोडगा काढण्याचा प्रशासन प्रयत्न करेल.”
भविष्यातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी तत्काळ तोडगा आवश्यक
सध्या पोलिस व महसूल प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी दोन्ही गावांमध्ये अद्यापही तणावाचे वातावरण आहे. भविष्यात अशा घटनेचे गंभीर पर्यवसान होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
