मतदार नोंदणीचा फसवणूक कारभार – सैन्यातील जवानाच्याच नावाने बनावट अर्ज! बीएलओ ने माफीनामा लिहून दिला

स्वतःवर गुन्हा दाखल झाल्यानंतरही पत्रकार अजित अंजुम कोणत्याही दबावाला भीक घालत नाहीत. त्यांनी बिहार राज्यातील जहानाबाद जिल्ह्यातील घोसी विधानसभा क्षेत्रात एक गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे.अजित अंजुम यांना माहिती मिळाली की काही मतदारांचे अर्ज त्यांच्या परवानगीशिवाय भरले गेले आहेत. या प्रकरणाचा शोध घेत ते जहानाबाद जिल्ह्यात पोहोचले, विशेषतः ‘काकू’ ब्लॉकमधील एका गावात, जिथे भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या राजकुमार प्रसाद नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आले. राजकुमार प्रसाद सध्या जोधपूर येथे पोस्टिंगवर आहेत.

त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या स्वतःच्या, त्यांच्या पत्नीच्या व आईच्या मतदार अर्जांची माहिती नसतानाही हे अर्ज स्थानिक बीएलओ (Booth Level Officer) ने भरून, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केले. ही माहिती मिळाल्यावर अजित अंजुम घोसी विधानसभा क्षेत्रात जाऊन राजकुमार प्रसाद यांची भेट घेऊन आले.राजकुमार प्रसाद यांनी सांगितले की त्यांनी स्वतः अर्ज भरण्यासाठी विशेष सुट्टी घेतली होती. मात्र, त्यांना समजले की त्यांच्या व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अर्ज आधीच भरले गेले होते. ते म्हणाले की, बीएलओने त्यांच्या आईचा अंगठा घेतलेला नाही, फोटो लावलेला नाही आणि कोणतीही स्वाक्षरी नसताना अर्ज अपलोड करण्यात आला.

राजकुमार प्रसाद यांनी बीएलओ अजय कुमार सिन्हा यांच्या निवासस्थानी जाऊन अर्ज पुन्हा सादर करण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांनी पाहिले की सर्व सरकारी कागदपत्रं बीएलओकडे आहेत. राजकुमार प्रसाद यांनी बीएलओला विचारले की, त्यांनी अर्ज कसा अपलोड केला, तर बीएलओ म्हणाले की, “माझ्याकडे असलेल्या जुन्या प्रतीवरूनच मी अर्ज भरला.”बीएलओने स्पष्ट केलं की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्यांनी हे काम केलं. त्यांनी 17 जुलै रोजी एक माफीनामा लिहून दिला, ज्यात त्यांनी ही चूक मान्य केली आणि पुढे अशी चूक होणार नाही, असं वचन दिलं. त्या माफीनाम्यात बीएलओने आपल्या दहाही बोटांचे ठसेही दिले.या प्रकरणात अजित अंजुम यांनी हे लक्षात आणून दिलं की, जर भारतीय लष्करातील एका सैनिकाचं मत फसवणूक करून घेतलं जाऊ शकतं, तर सामान्य नागरिकांचं काय होईल? त्यांनी यासंदर्भात संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करून पुरावे गोळा केले.

अजित अंजुम यांची मागणी आहे की, निवडणूक आयोगाने चुकीचे अर्ज रद्द करून, योग्य अर्ज स्वीकारावेत, अंतिम मतदार यादी जाहीर होण्याआधी (1 ऑगस्ट) हे सर्व दुरुस्त व्हावे, बीएलओवरच नव्हे, तर या चुकीस जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी.

राजकुमार प्रसाद यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, “मी स्वतः सरकारी सेवेत आहे, माझा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास आहे. मात्र, जर आमच्याच सोबत असं घडत असेल, तर इतर सामान्य नागरिकांचं काय?”पत्रकार अजित अंजुम म्हणतात, “पत्रकार म्हणून आपली जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या चुकींचा शोध घेऊन आवाज उठवावा. केवळ बीएलओला बळीचा बकरा बनवू नका, तर खरे जबाबदार कोण आहेत हे शोधून त्यांच्यावर कारवाई करा.”

बिहारमध्ये मतदान कमी करण्याचा डाव? – अजित अंजुम यांची धगधगती उकल!  

संपूर्ण बिहार राज्यातील निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांसह नागरिकत्व तपासण्याचा खेळ रचला गेला आहे. तसेच, विहार राज्यातील जवळपास २० टक्के मतदान कमी करण्याचा निवडणूक आयोगाचा डाव असल्याचा आरोप एका पत्रकाराने केला आहे. ही गोष्ट उघडकीस आणून श्री. अजित अंजुम यांनी खरेच मोठे कार्य केले आहे. हे पाहून भारतातील प्रत्येक पत्रकाराला लाज वाटली पाहिजे.

 

जर हे आधी घडले असते, तर आपापल्या जिल्ह्यातील अनेक अशा खोट्या आणि बनावट कथा इतर पत्रकारांनी देखील उघड केल्या असत्या. पण आज केवळ अजित अंजुमच असे प्रयत्न करत आहेत. ते देखील या वयात ग्राउंड लेव्हलवर पत्रकारिता करत आहेत. ही खरोखर लाज वाटावी अशी बाब आहे.त्यांच्याकडे दोन-तीन माणसे आहेत, कार्यालय नाही. स्वतःच्या घरातूनच व्हिडिओ बनवतात. गावोगावी फिरून मतदारांच्या भेटी घेतात आणि सत्य शोधतात. यालाच खरी पत्रकारिता म्हणतात.

आज अनेक पत्रकारांना असे वाटते की सरकारच्या बाजूनेच लिहावे लागते. पण ज्यांनी स्वतःला विकले आहे, त्यांची खरी पत्रकारिता हरवलेली आहे. जात, पक्ष किंवा सरकार यापेक्षा सत्याला समोर आणण्याचा ध्यास असावा लागतो.आजचे नवोदित पत्रकार अजित अंजुमकडून प्रेरणा घ्यावी, कारण एक पत्रकार ठरवले तर सरकारला कसे उघडे पाडता येते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!