नांदेड(प्रतिनिधी)-वाळू व इतर गौण खनिजांच्या अनाधिकृत उत्खन्न, वापर आणि वाहतुक या संदर्भाने नवीन नियमावली तयार झाल्याचे परिपत्रक महसुल व वन विभागाने 17 जुलै रोजी निर्गमित केले आहे. यावर कार्यासन अधिकारी सदानंद मोहिते यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. गौण खनिज विषयांमध्ये हयगय किंवा कसुरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुध्दा कार्यवाही होणार.
राज्यात गौण खनिजाबाबतचा विषय महसुल व वनविभागाकडून हाताळण्यात येतो. यासाठी महाराष्ट्र गौण खनिज नियम 2013 तयार करण्यात आले होते. गौण खनिज काही स्वरुपात लघु उद्योगांसाठी वापरले जाते. तर काही गौण खनिज औद्योगिक उपयोगासाठी सुध्दा वापरले जाते. परंतू राज्यात वाळू व इतर गौण खनिजांचे अनाधिकृत उत्खन्न, वापर, वाहतुक व तस्करीचे प्रकार निदर्शनास आले. त्यामुळे राज्याच्या महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे.
या चुकीचे काम करणाऱ्या लोकांकडून शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याही जीवतास धोका निर्माण झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे बरेच प्रश्न तयार झाले आहेत. म्हणून अशा व्यक्तीविरुध्द कार्यवाही आवश्यक आहे. यासाठी शासनाने नवीन दिशानिर्देशक जारी केले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र जमीनी महसुल संहिता 1966 प्रमाणे एफआयआर करण्याचे काम महसुल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच करावे. अशा लोकांविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करतांना महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966, भारतीय न्याय संहिता, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1966, खाण आणि खणिज अधिनियम 1958, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम या कायद्यानुसार कार्यवाही करतांना महसुल अधिकारी, पोलीस अधिकारी व संबंधीत सक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करावी.
वाळू व इतर गौण खनिज अवैध उत्खन्न, वापर, वाहतुक व तस्करीपासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार कलाकृतीचे विनाकारण प्रदर्शन करणारे व्यक्ती, धोकादायक व्यक्ती, अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांच्याविरुध्द स्थानबध्दतेचा आदेश जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांनी करावा. गौण खनिजांविषयक गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीकडून पुन्हा तो गुन्हा घडला तर त्याला वाळू तस्कर असे म्हटले जाईल. त्याविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाईल.
गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्ह्याच्या तपास दृष्टीने महसुल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, व संबंधीत सक्षम अधिकाऱ्यांनी दाखल गुन्ह्यात आरोपीविरुध्द गुन्ह्याची सिध्दता होण्यासाठी एक दुसऱ्याला सहकार्य करावे. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या कार्यालयात या संदर्भाने सुचना द्याव्यात.
गौण खनिजांचे अवैध उत्खन्न, वापर, वाहतुक व तस्करी करणाऱ्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यास अथवा दाखल गुन्ह्याच्या अनुशंगाने तपासादरम्यान पोलीस, महसुल यंत्रणेमधील तसेच संबंधीत सक्षम यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांनी हयगय किंवा कसुरी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्याविरुध्द संबंंधीत जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि पोलीस आयुक्त यांनी कार्यवाही करावी. हे परिपत्रक शासनाने संकेतांक क्रमांक 202507171226109919 नुसार आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.
वाळु तस्कारांसोबत हात मिळवणाऱ्या पोलीसांवर सुध्दा आता कार्यवाही
